पुणे : दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करून भक्तांशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूच्या पोलीस कोठडीत ४ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश मंगळवारी न्यायालयाने दिले. प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार (वय २९, रा. सूस गाव, मुळशी) असे अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे.
याबाबत एकाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीकडून तीन मोबाइल संच, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड, तसेच निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त करण्यात आले आहे. आरोपीने एका ॲपद्वारे भक्तांचे चित्रीकरण केले. त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.
फसवणूक करून मिळविलेल्या पैशांमधून त्याने मालमत्ता खरेदी केली का? तसेच त्याची संस्था कायदेशीर आहे का? यादृष्टीने तपास करायचा असल्याने तामदार याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने तामदार याच्या पोलीस कोठडीत चार जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.