Crime News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांपैकी एकाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिच्यावर बलात्कार केला. तसंच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाल्याची ही घटना आहे.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चार चाकी गाडीतून एक कुटुंब पंढरपूरला देवदर्शनसाठी जात होतं. सोमवारी (दि.३० जून) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वामी चिंचोली येथे महामार्गाच्याजवळ असलेल्या एका टपरी जवळ चार चाकी वाहनातून काही महिला व पुरुष उतरले. ते या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी दोन अज्ञात इसम या ठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यांमध्ये लाल रंगाची चटणी टाकून महिलांच्या गळ्यातील १ लाख ५० हजाराचे दागिने लुटले आणि त्यातील एकाने एका अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झुडुपांमध्ये अंधारात फरपटत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘द हिंदू’ने हे वृत्त दिलं आहे.

रोहीत पवार यांची पोस्ट काय?

चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार करण्याची आणि वारकऱ्यांसह असलेल्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात गुंडांनी अत्याचार केल्याची दौंडमध्ये घडलेली घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. राज्यात कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिली नसून गुंडांना कशाचाही धाक उरलेला नाही. आज वारकरीही सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रात जंगलराजच सुरू आहे, असंच म्हणावं लागेल. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी केवळ गप्पा हाणणारे गृहमंत्री कधी जागे होतील? काल कर्जत-जामखेड तर आज दौंड दररोजच कुठं ना कुठं अत्याचाऱ्याचा घटना घडत आहेत, पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे. अशी पोस्ट रोहीत पवार यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान लूटमार आणि बलात्काराच्या या घटनेने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश शिळीमकर , पोलीस निरीक्षक गोपाळ पवार , नारायण देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. दरम्यान या प्रकरणावरुन रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.