लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी, तसेच महंमदवाडी येथील निवासस्थानांवर सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती.

बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॅड्रिंग) प्रकरणी बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने मंगळवारी छापे टाकले. ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर बांदल यांना रात्री उशीरा ईडीकडून अटक करण्यात आली.

आणखी वाचा-Pune Car Accident Case : अपघातग्रस्त पोर्श मोटार परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती. शिरुर विधानसभा मतदार संघातून बांदल निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. बांदल यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.