पुणे : गणेशोत्सवात भाविकांकडील मोबाइल संच, दागिने, रोकड, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. सराइतांना पकडल्यानंतर त्यांना लष्कर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या ‘डिटेंशन सेंटर’मध्ये ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लाॅक अप) गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना ठेवण्यात येते. उत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: मद्यधुंद संगणक अभियंत्याकडून पोलिसांना मारहाण, अभियंत्यासह भाऊ अटकेत

उत्सवाच्या काळात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडतात. भाविकांकडील दागिने, मोबाइल, चोरी करणाऱ्या चोरट्यांना फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात येते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत क्षमतेपेक्षा जास्त आरोपी असतात. त्यामुळे लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत स्थानबद्ध केलेल्या सराइतांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

उत्सवाच्या काळात परराज्यांतून चोरट्यांच्या टोळ्या शहरात येतात. चोरट्यांच्या टोळ्या मध्य भागातील लाॅजमध्ये उतरतात. त्यामुळे उत्सव सुरू झाल्यानंतर मध्य भागातील प्रत्येक लाॅज, हाॅटेलची तपासणी करण्याची सूचना गुन्हे शाखेतील पथके आणि स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. उत्सवात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराइतांची यादी गुन्हे शाखेने केली आहे. त्यानुसार सराइतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शहर परिसरात साडेपाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

\हेही वाचा : Video: …अन् अजित पवारांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताची केली मदत, नेमकं काय घडलं?

सडक सख्याहरींना चाप

गणेशोत्सवात महिला, तसेच तरुणींची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना चाप लावण्यात येणार आहेत. छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस सडक सख्याहरींना पकडून त्यांचे छायाचित्र भर चौकात लावणार आहेत. छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांचे दागिने चोरणे, तसेच मोबाइल संच चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्य भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिला पोलिसांची पथके, तसेच दामिनी पथकांकडून गर्दीत गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांच्या पथकांकडून गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाविकांना मदत करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांत पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात मदत केंद्रांचे काम अहोरात्र सुरू राहणार आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मनोरे उभे करण्यात आले आहेत.