पुणे : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी अटक केली. शाम ज्ञानोबा हातागळे (वय ५०, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिलेची १६ वर्षीय नात मतिमंद आहे. ती सोमवारी (३० जून) दुपारी घरासमोर खेळत होती. त्या वेळी आरोपी हातागळे तेथे आले. त्याने मुलीला आमिष दाखवून वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. तेथे मुलीला धमकावून त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने आजीला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आजीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
हातागळे याच्याविरुद्ध मंगळवारी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
रिक्षा प्रवासी मुलीसोबत अश्लील कृत्यू
दरम्यान, रिक्षा प्रवासी अल्पवयीन मुलीशी एकाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ही मंगळवारी (१ जून) दुपारी मुलीसोबत रिक्षातून पुणे-सोलापूर रस्त्याने निघाली होती. त्या वेळी रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या एकाने महिलेच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. तिने रिक्षातील प्रवाशाला जाब विचारला. तेव्हा रिक्षातील प्रवाशाने महिलेला शिवीगाळ केली. तिला धमकी देऊन तो पसार झाला. याबाबत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, रिक्षा प्रवाशाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बोबडे तपास करत आहेत.