बारामती : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राज्यात यंदा दिवाळी साजरी करण्यात येणार नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी जाहीर केले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.

बारामतीत गोविंद बाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाकडून यंदा दिवाळी साजरी करायची नसल्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अस्वस्थ असून, दिवाळी साजरी करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे पक्षाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.’

‘राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यात आलेली नाही. या प्रकरणात राजकारण आणले जात आहे. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. मात्र, ज्यांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे, त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. राज्य सरकारने केलेली मदत कमी आहे. त्यातून कुठलेही नुकसान भरून येऊ शकत नाही.’ अशी टीकाही पवार यांनी केली.

‘मतदार यादीवरून महाविकास आघाडीतील पक्ष नाराज आहेत. याविषयी निवडणूक आयोगासमोर सर्व गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. पुढे काय होणार याकडे लक्ष आहे,’ असेही पवार म्हणाले.

पुरंदर येथील नियाजित विमानतळाबाबत पवार म्हणाले,‘विमानतळ कोठे करायचे, हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. विमानतळासाठी काही शेतकऱ्यांची संपूर्ण शेती ताब्यात घेतली जाणार आहे. अशा वेळी त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई याबाबत शेतकरी वर्गात शंकेचे वातावरण असून, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना योग्य नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. संबंधित शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली.

या प्रकरणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्ग काढण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करणार आहे.’