पुणे : हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवी यांना आत्महत्येस प्रवृत्त कसे केले, त्यांनी कसा त्रास दिला, याबाबतचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती बावधन पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. वैष्णवी यांच्या बाळाचा बेकायदा ताबा घेणाऱ्या चव्हाणने काही त्रास दिला का, या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पसार झालेल्या नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३४, रा. कर्वेनगर) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली. वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखविला होता. वैष्णवी यांचा पती शशांक, सासू, लता आणि नणंद करिष्मा यांचे मोबाइल संच नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. हगवणे कुटुंबीय चव्हाणच्या संपर्कात होते. त्यांचे संभाषण, संदेश, तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती तपासात उघड झाली आहे.
आत्महत्या प्रकरणात चव्हाण याच्यासह सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७, दोघे रा. भुकूम, मुळशी) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर तिघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. वैष्णवी यांचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, सध्या ते येरवडा कारागृहात आहेत. बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात तपासाबाबत न्यायालयात माहिती दिली.
चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ
नीलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले. सासरे राजेंद्र आणि सुशील यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आले. चव्हाणने हगवणे कुटुंबीयांना चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी चव्हाणच्या पोलीस कोठडीत सात जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. हगवणे पिता-पुत्रांना १६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.