पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विश्रांतवाडी, पुणे-सोलापूर रस्ता, तसेच सासवड रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या. विश्रांतवाडी भागात आळंदी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सलीम शेख (वय १९, रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सलीम शेख याचा मोठा भाऊ अकबर (वय ४५) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम १८ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आळंदी रस्त्याने निघाला होता. त्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या सलीम याला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सलीम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शेषराव जाधव (वय ३०, सध्या रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी ) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार दिनकर दगडू जाधव (वय २८, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) जखमी झाला आहे. जाधव याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी ट्रकचालक सागर शरणप्पा ऐहोळे (वय २५, रा. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दिनकर आणि त्याचा मित्र संतोष हे मूळगावी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी परिसरात सोमवारी (३० जून) दुपारी एकच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी संतोष गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार दिनकर याला दुखापत झाली. संतोष याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत. हडपसर-सासवड रस्त्यावर रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी रिक्षाचालक मारुती सहदेव नवघणे (वय ४० रा. बेदवाडी, फुरसुंगी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रवीण पोटे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ जून रोजी पादचारी हडपसर-सासवड रस्त्यावरुन निघाला होता. फुरसुंगीतील भेकराईनगर परिसरात भरधाव रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. अपघातात डोक्याताल गंभीर दुखापत झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पादचाऱ्याचे वय अंदाजे ५० वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत. शहरात गंभीर स्वरुपांच्या अपघातांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात शहरात वेगवेगळ्या अपघातात १४० जणांचा मृत्यू झाला आहे.