पिंपरी : पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत पंडित सुरेश तळवलकर यांनी सादर केलेल्या अप्रतिम तालरचनेतून आणि बंदिशीतून रसिक चिंब झाले. शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सादर केलेल्या बंदिशीच्या आविष्काराच्या मंगलदीपाने वातावरण उजळून निघाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या बहारदार सोहळ्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त पंकज पाटील यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते. तळवलकर यांच्या ‘तालयात्रा’ कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली.
पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत ‘तालयात्रे’च्या माध्यमातून तळवलकर व त्यांच्या साथीदारांनी रंगमंचावर जणू स्वरांची एक जादुई मैफलच उभी केली होती. तबल्याच्या लयीत मिसळलेली व्हायोलिनची धून, प्रत्येक बंदिशीला रसिकांनी टाळ्यांच्या रूपात दिलेल्या आभाळभर शुभेच्छा, या साऱ्यांनी सभागृह भारून टाकले होते.
सोहनी रागातील बंदिश ‘चलो हटो पिया’, तीन ताल राग ‘चंद्रकंस’ अशा एकामागोमाग येणाऱ्या संगीतमय बंदिशींची रचना म्हणजे जणू भावनांचा प्रवाहच होता, ज्यात रसिक चिंब झाला, तर या बंदिशींवर मौसमी जाजू यांनी कथक नृत्य सादर करीत कार्यक्रमाची उंची वाढवली. भारतीय वाद्यांसोबत पाश्चात्त्य वाद्य वापरून भारतीय संगीताचा, तसेच वाद्यांच्या भाषेचा सुंदर आविष्कार या कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांनी अनुभवला.
तालयात्रेमध्ये तळवलकर यांना नागेश आडगावकर (सहगायक), सुरंजन खंडाळकर (सहगायक), अभिषेक शिनकर (हार्मोनिअमवादन), पुष्कर भागवत (व्हायोलिनवादन), सावनी तळवलकर (तबलावादन), वेदांग जोशी (तबलावादन), पार्थ भूमकर (पखवाजवादन), अभिषेक भुरूख (ड्रम वादन), ईशान परांजपे (कॅजोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश) यांनी साथसंगत केली.
पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचा तरल स्वर व त्यातून बरसणाऱ्या शास्त्रीय गीतांच्या सरी आणि रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे नाट्यगृहातील वातावरण प्रफुल्लित झाले. जोगळेकर यांनी भावगीत आणि शास्त्रीय गायनाची बहारदार मैफल सादर केली. ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मनी लागले जिथे लागले’ यांसारख्या भावस्पर्शी गीतांनी श्रोत्यांचे डोळे पाणावले, तर शास्त्रीय गायनाच्या आलापांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
‘मंगल चरणा गजानन’, ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ इत्यादी गीतांनी श्रोत्यांचे मन जिंकले. जोगळेकर यांना महेश खानोलकर (व्हायोलिनवादन), त्रिगुण पटवर्धन (तबलावादन), मंदार पारखी (सिंथेसायझरवादन), नागेश भोसेकर (तालवाद्य), सोनाली बोरकर (हार्मोनिअमवादन), तन्वी जोशी (कोरस) यांनी साथसंगत केली.