पुणे : ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वाॅर्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला तीन दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. त्याच दरम्यान आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयाच्या एकूणच कामाचा आढावा घेतला आणि त्यावेळी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली.
त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना सौरभ राव म्हणाले की, वॉर्ड क्रमांक १६ मधील आरोपी ललित पाटील हा एक्सरे काढण्यासाठी बाहेर आला होता. त्यावेळी तो तेथून पळून गेला आहे. त्या घटनेनंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज वॉर्ड क्रमांक १६ ची पाहणी केली असून येरवडा कारागृहामधून ससूनमध्ये उपचारासाठी जेवढे कैदी येतात, त्या कैद्यांवर सध्या कोणत्या आजाराबाबत उपचार सुरू आहेत, त्या संदर्भात तीन जणांची समिती गठीत करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात ७५ आयुर्वेदिक वनस्पतींचे अमृत उद्यान
त्या कैद्यांवर उपचाराची आवश्यकता असल्यास उपचार करण्यात येतील,अन्यथा कैद्यांना येरवडा कारागृहात सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून यामध्ये कोणी दोषी आढळल्यास निश्चित कारवाई होणार असल्याची ग्वाही यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.