पुणे : कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात तरुणीने दिलेल्या तक्रारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित तरुणीचा मित्र असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलीस त्यामुळे अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षाप्रत पोचले नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी (२ जुलै) एका संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली. ‘एक तरुण कुरिअर कंपनीतील कर्मचारी असल्याची बतावणी करून घरात शिरला. त्याने तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करून बलात्कार केला,’ अशी फिर्याद कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीने दिली होती. त्यानंतर तरुणीने दिलेल्या वर्णनावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासावर देखरेख ठेवली होती. सुमारे ५०० पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते.

पोलिसांनी शुक्रवारी बाणेर भागातील एका संगणक अभियंत्याला याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा, अभियंता आणि फिर्यादी तरुणी एकमेकांना ओळखणारे असल्याचे स्पष्ट झाले. हा तरुण तिच्या घरी नेहमी यायचा. दोघे एकत्र फिरायलाही जात असत. त्यांचा दररोज परस्परांशी संपर्क होता, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेत बेशुद्ध करण्याचा स्प्रे मारल्याच्या दाव्यात तथ्य दिसत नसल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. तरुणीने बलात्कार झाल्याची तक्रार नेमकी का केली, याच्या कारणाचा आम्ही शोध घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप पोलीस कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाहीत. पीडित तरुणीचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जात आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.

पोलीस तपासात काय?

  • घटनेच्या दिवशी संशयित तरुण सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत आला होता. त्यानंतर तो पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडला. सोसायटीतील कॅमेऱ्यांनी त्याला टिपले होते.
  • पोलिसांनी संशयित तरुणाविषयी विचारपूस केली, तेव्हा तरुणीने ओळख नाकारली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पाेलिसांनी कोंढव्यातील सोसायटीपासून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली.
  • संशयित तरुण बाणेर भागात वास्तव्यास आहे. जवळपास ५५० ठिकाणचे चित्रीकरण तपासण्यात आले.
  • पोलिसांनी संशयिताबाबत तरुणी राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आलेल्या तरुणाचे छायाचित्र रहिवाशांना दाखविले, तेव्हा तरुण तिच्या घरी आल्याचे उघडकीस आले.
  • तरुणीला संशयिताचे छायाचित्र दाखविण्यात आले, तेव्हा तरुणी क्षणभर गोंधळून गेली. तेव्हा, वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आला.
  • तरुणीच्या कॅमेऱ्यात छायाचित्र सापडले होते. ते छायाचित्र तिने एका ॲपचा वापर करून ‘एडिट’ करून तरुणीने हा संदेश स्वत:च्या मोबाइलवर घेतल्याचे आढळले.