पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला थाेरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आक्षेपार्ह मजकूर असलेला फलक लावणाऱ्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात कमलेश प्रधान (वय ४७, रा. गणेशनगर, धायरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, डेक्कन पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाखाली अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार बुधवारी (२५ जून) दुपारी साडेचारच्या सुमारास निदर्शनास आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलेश प्रधान यांचे घोले रस्ता येथे कार्यालय आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकाच्या दर्शनी भागात आक्षेपार्ह मजकूर असलेला अनधिकृत फलक लावला होता. हवालदार येरुणकर तपास करीत आहेत.