पुणे : शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऊन, ढगाळ हवामान, वारे असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील काही भाग, विशेषत: घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला आहे. कुरवंडे, ताम्हिणी, लोणावळा, भोर अशा ठिकाणी अनेकदा एका दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, आता घाटमाथ्यासह शहर आणि जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दिवसभरात पावसाची एखादी हलकी सर पडते. कधी स्वच्छ ऊन पडते, तर काही वेळा वातावरण ढगाळ असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी वाढलेले कमाल तापमानही आता कमी झाले आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘मोसमी वारे तीव्र आहेत. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडत आहे. वाऱ्यामुळे सपाट भागात ढग येईपर्यंत त्यातील बाष्प कमी होत आहे. त्यामुळे एखादी सर दिवसभरात पडते. ही स्थिती सर्वसाधारणच आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन ते तीन दिवस काही प्रमाण पाऊस वाढू शकतो.’
जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार २९ जूनपर्यंत पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १४१.९ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा २९१.५ मिलीमीटर, म्हणजेच सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.