निवडणुकांच्या तोंडावर शिरूरमध्ये राजकीय उलथापालथीचे संकेत

बाळासाहेब जवळकर, पिंपरी

शिरूर लोकसभेतून लढण्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची सततची नकारघंटा, इतर कोणी उमेदवार नसल्यास शिरूरमधून लढण्याची तयारी असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले विधान, खासदारकीची हॅटट्रिक साधणारे खासदार शिवाजीराव आढळराव चौथ्यांदा आखाडय़ात, भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे तळय़ात-मळय़ात अशा अनेक घडामोडी शिरूर लोकसभेच्या रिंगणात सुरू असल्याने प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र परिसर असलेल्या शिरूर मतदारसंघात मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. जिल्ह्याच्या राजकारणात शिरूर मतदारसंघ कायम चर्चेत राहिला आहे. दिलीप वळसे आणि आढळराव यांच्यात वरकरणी राजकीय संघर्ष असला तरी शिरूर लोकसभा आणि आंबेगाव विधानसभेच्या राजकारणात त्यांच्यात सामंजस्य दिसून येते. भोसरीतून अपक्ष निवडून आलेल्या आमदार लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच शिरूरसाठी शड्डू ठोकले होते. नंतर मात्र त्यांनी लोकसभेऐवजी भोसरी विधानसभा लढवण्याची भूमिका घेतली. आता पक्षाने आदेश दिल्यास शिरूरमधून लढू, असे विधान त्यांनी केले आहे. सन २००९ मध्ये शरद पवारांनी शिरूर लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती. मात्र त्यांनी माढा लोकसभेचा पर्याय निवडला. अलीकडेच, अजित पवारांनी शिरूरमधून निवडणूक लढवण्याची भाषा केली. प्रत्यक्षात ते शिरूरमध्ये फिरकणार नाहीत. त्यांचा निशाणा कोणावर होता, याची राष्ट्रवादी वर्तुळात सर्वानाच माहिती आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, असे राष्ट्रवादीतील नेत्यांचे मत आहे. अजित पवार यांनी तसे जाहीरपणे यापूर्वी मत व्यक्त केले होते. पण दिलीपराव लोकसभेची निवडणूक लढविण्याचे टाळतात. राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा त्यांना अनुभव मिळाला आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असे मत पक्षात मांडले जाते.  खासदार आढळराव चौथ्यांदा रिंगणात आहेत. पूर्वी ते वळसे पाटलांचे निकटवर्तीय होते. पुढे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. आढळराव शिवसेनेत गेले. सन २००४च्या लोकसभा निवडणुकीत आढळरावांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार अशोक मोहोळ यांचा पराभव केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा पावणेदोन लाख मतांनी पराभव केला. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तीन लाखांच्या फरकाने पराभव करत आढळरावांनी हॅट्ट्रिक साधली. आतापर्यंतच्या प्रवासात आढळरावांना भाजपशी असलेल्या युतीचा फायदाच झाला. यंदा भाजपशी युती न झाल्यास त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. राष्ट्रवादीला शिवसेनेकडून झालेल्या सलग तीन पराभवाचे उट्टे काढायचे आहे. भाजपला स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आल्यास आमदार लांडगे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, यावर शिरूरच्या लढतीचे स्वरूप ठरणार आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. पुणे हा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. चारपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीला मावळ किंवा शिरूरमध्ये यश संपादन करता आले नाही. पुणे शहर हा मतदारसंघ आघाडीत कायम काँग्रेसच्या वाटय़ाला जातो. आढळराव यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला जात नाही. हेच आढळराव यांच्या पथ्यावर पडते.

शिरूर मतदारसंघात जवळपास १२ हजार कोटींची कामे झाली आहेत. अनेक कामे मंजूर झालेली आहेत. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. विरोधक केवळ बाता मारतात. स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांचा निवडणुकांच्या तोंडावर कांगावा सुरू आहे. ते आपल्यासमोर टिकणार नाहीत. पुणे-नाशिक रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विमानतळाच्या स्थलांतरावरून होणारी टीका निर्थक आहे. दाऱ्या घाटाचा विषय वन खात्याच्या लालफितीत अडकला आहे. क्रांतिकारक राजगुरू यांचे स्मारक खासदार निधीतून उभारले आहे. भाजपशी युती झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

– शिवाजीराव आढळराव (खासदार, शिवसेना)

खोटं बोल, पण रेटून बोल, ही आढळराव यांची कार्यपद्धती आहे. त्यांनी नागरिकांची कायम दिशाभूल केली. सलग तीन वेळा खासदार आणि सत्तेत असूनही त्यांना मतदारसंघातील कामे करता आली नाहीत. रेल्वे सुरू करण्याच्या बाबतीत ते सातत्याने वेगवेगळी विधाने करतात. उद्योगधंदे आणले नाहीत. पुणे-नाशिक रस्त्याची ओरड आहे. महत्त्वाच्या रस्त्यांची कामे झालेली नाहीत. भीमाशंकर आराखडा, विमानतळ, एसईझेड, बैलगाडा शर्यती अशा विषयांत त्यांचे राजकारण सर्वाच्या लक्षात आले आहे. खासदार निधीतून किती कामे झाली, हे त्यांनी जाहीर करावे.

– विलास लांडे, माजी आमदार (राष्ट्रवादी)

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-नाशिक महामार्ग, रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूककोंडी, बैलगाडा शर्यतींवरील बंदी, विमानतळाचे स्थलांतर, दाऱ्या घाटाचा प्रलंबित प्रश्न, पाण्याची टंचाई, शेतीमालाला हमीभाव, औद्योगिक पट्टय़ातील खंडणीखोरी असे मतदारसंघातील विषय निवडणुकीच्या काळात कळीचा मुद्दा ठरणारे आहेत.

विधानसभेचे राजकीय चित्र

आंबेगाव-       राष्ट्रवादी

जुन्नर-           मनसे

खेड-              शिवसेना

शिरूर-           भाजप

हडपसर-        भाजप

भोसरी-          अपक्ष

 (संलग्न भाजप)