पुणे : तोंडाच्या कर्करोगाची शक्यता असल्यास त्याचे अचूक निदान करणाऱ्या ओरल स्कॅन या वैद्यकीय उपकरणासाठी डॉ. सुभाष नारायणन यांना यंदाचा अंजनी माशेलकर इनक्लुसिव्ह इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी कमीत कमी किमतीत तोंडाच्या कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर होत आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या मातोश्री अंजनी माशेलकर यांच्या स्मरणार्थ २०११ मध्ये अंजनी माशेलकर इनक्लुसिव्ह इनोव्हेशन पुरस्कार देण्यास सुरुवात केली. गरीब आणि सर्वसामान्यांना परवडेल तसेच उपयुक्त ठरेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा दृकश्राव्य कार्यक्रमात डॉ. नारायणन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. सुभाष नारायणन हे सॅस्कॅन मेडिटेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तोंडातील जखमांवरून कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी त्यांनी ओरलस्कॅन या उपकरणाची निर्मिती केली आहे.  डॉ. नारायणन म्हणाले, मी अवघ्या १२ वर्षांचा असताना माझ्या आईला कर्करोगाचे निदान झाले. निदान आणि औषधोपचारांतील विलंब यांमुळे तिला कर्करोगाच्या वेदना असह्य होत. आज ५० वर्षांनंतरही मी ते विसरू शकलेलो नाही. त्यामुळेच कर्करोगाचे निदान अचूक, वेगवान आणि कमीत कमी किमतीत करणारे उपकरण तयार करणे हे माझे उद्दिष्ट होते. त्याच ध्यासातून ओरलस्कॅनचा जन्म झाला. सहज हाताळता येईल अशा या उपकरणामध्ये कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्यामुळे तोंडातील जखमांचे जवळून छायाचित्र घेणे शक्य आहे. कर्करोगाचे निदान करणाऱ्या बायोप्सी टाळणे त्यातून शक्य होणार आहे. आतापर्यंत भारतातील आठ राज्यांमध्ये त्याचा वापर होत आहे. तब्बल एक हजारांहून अधिक रुग्णांना त्याचा उपयोग झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, अंजनी माशेलकर इनक्लुसिव्ह इनोव्हेशन फाउंडेशनच्या सर्व पुरस्कारार्थीचे काम हे तळागाळातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंदाजानुसार येत्या पाच वर्षांत त्यामध्ये १२ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तोंडाच्या कर्करोगाचे जगाच्या एक तृतीयांश रुग्ण भारतात आढळतात. भारतातील ३० टक्के कर्करुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे आहेत. त्यांपैकी निम्मे रुग्ण वेळेत निदान न झाल्याने दगावतात. ओरलस्कॅन या संशोधनामुळे हे प्रमाण रोखणे शक्य होणार असल्यामुळेच हे संशोधन पुरस्काराचे मानकरी आहे.