पुणे : मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर एका टप्प्यावर ‘ब्रेक मान्सून’ (सलग १० ते १५ दिवस पावसाचा खंड) ही वातावरणीय प्रणाली निर्माण होत असते. मात्र, यंदा राज्यात कोणत्याही भागांत अशा प्रकारे मोसमी पावसाने दीर्घ सुटी घेतली नाही. कमी दाबाच्या पट्ट्यांनी बदललेली दिशा आणि त्यातून पावसाने बदललेल्या स्वरूपामुळे महाराष्ट्रात ही स्थिती निर्माण होऊन धारणांत मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असले, तरी पावसाने आवश्यक असलेला खंड न दिल्याने त्याचा पिकांच्या पोषणाला काहीसा फटका बसू शकतो, असे अभ्यासकांचे मत आहे.

राज्यात पावसाच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, जुलै, ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आणि आता सप्टेंबरच्या मध्यानंतरही बहुतांश भागात पाऊस सक्रिय आहे. या पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणे वेळेपूर्वीच भरली आहेत. सध्या राज्यातील धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. अनेक धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात सद्य:स्थितीत २६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वच जिल्ह्यांची पावसाची सरासरी पूर्ण केली असून, आता अतिरिक्त पावसाची नोंद होत आहे.पावसाच्या प्रमाणाच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक असली, तरी वातावरणीय प्रणालीनुसार मोसमी पावसाच्या हंगामात त्याचा दीर्घ खंडही आवश्यक असतो. मात्र यंदाच्या हंगामामध्ये १० ते १५ दिवसांचा पावसाचा दीर्घ खंड राज्याच्या कोणत्याही भागांत झाला नाही. तुरळक भागांत आठवड्यापर्यंतचा खंड पडला असला, तरी आकाशाची स्थिती प्रामुख्याने ढगाळ राहिली. सातत्याने कमी दाबाचे पट्टे किंवा स्थानिक वातावरणातून राज्याच्या विविध भागांत पाऊस झाला.

हेही वाचा : इन्स्पायर पुरस्कारांमध्ये राज्याला सुवर्णपदक ; साताऱ्याच्या यश शिंदेचा प्रकल्प विजेता

पावसाचा खंड का नाही?

देशातील पावसाने यंदा त्याचे स्वरूपच बदलले आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बहुतांश वेळेला उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे न जाता मध्य भारताकडे वळले. त्यातून महाराष्ट्रात पाऊस झाला. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र आणि बाष्पाचा फायदाही नेहमीप्रमाणे राज्याला मिळाला. मोसमी पावसाची आस उत्तरेकडे सरकली असताना महाराष्ट्रात पावसाचा खंड पडण्याची स्थिती होती. मात्र, त्या वेळी स्थानिक परिस्थितीतून राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यातून पावसाला मोठा खंड मिळाला नाही.

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची – पेशवे दरबारातील इंग्रजांच्या वकिलाचा ‘संगमावरचा बंगला’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यासकांचे मत काय?

‘ब्रेक मान्सून’ची स्थिती यंदा जाणवली नसल्याने शेतीच्या दृष्टीने काही प्रमाणात तोटे आहेत. याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, की ही स्थिती न जाणवणे यंदाचे वेगळेपण आहे. पण, त्यामुळे सूर्यप्रकाश, कमी आर्द्रतेचा अभाव, जमिनीचा वाफसा, ऊर्जा उत्सर्जनासह पिकातील तण काढणीस अडथळा आला. भरपूर पाऊस होऊनही पिकांची सुदृढता, वेळेत जोमदार पीक वाढीवर त्याचा नकारात्मत परिणाम जाणवतो. केवळ कीड, लष्करआळीच्या आक्रमणास काहिसा प्रतिबंध होण्यात मदत होऊ शकली.