पुणे : खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या त्यांच्या मागणीनंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाने त्यांच्याविषयी बदनामीकारक फलक लावले. मात्र, पुण्यातील भाजपने या प्रकारचा निषेध करण्याचीही तसदी न घेता खासदार कुलकर्णी यांच्या भूमिकेकडे स्थानिक नेत्यांनी काणाडोळा केला. मात्र, आता पुण्यातील नागरी प्रश्नांवरून त्यांनी ‘पुणेकरांचे जीवन बिकट झाले आहे’ अशी सडतोड भूमिका मांडत मागील पाच वर्षे पुणे महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपलाच ‘घरचा आहेर’ दिला. त्यामुळे पुण्यातील भाजपमधील विसंवाद चव्हाट्यावर येऊन तीन नेत्यांमधील शीतयुद्धाचा भडका उडाला आहे.

खासदार कुलकर्णी या कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. मात्र, पुण्याच्या राजकारणातून गेल्या पाच वर्षांपासून त्यांना डावलण्यात आले. तरीही त्यांनी राजकीय कणखरता आणि संयमाने या परिस्थितीला तोंड देत खासदार पदापर्यंत मजल मारली. त्यांचा हा राजकीय प्रवास त्यांच्या पक्षातीलच विरोधकांना पचनी पडलेला नाही. विरोधी गट खासदार कुलकर्णी यांना कायम प्रत्येक ठिकाणी डावलण्याची रणनीती खेळत आला आहे. त्यावरून भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. खासदार कुलकर्णी यांनी वेळोवेळी पुण्यातील प्रकल्प आणि समस्यांवरून घेतलेल्या भूमिकेवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

खासदार कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याचा मागणी केल्यावर शिवसेना (ठाकरे ) पक्षाकडून फलक लावण्यात आले. त्यामध्ये त्यांच्यावर बदनामीकारक टीका केल्याने त्या उद्विग्न झाल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याला समर्थन किंवा शिवसेनेच्या कृतीचा निषेध केला नाही. त्यावरून त्या पक्षातच एकाकी पाडल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन पुण्यातील वाहतूक, रस्ते, कचरा, पाणी यांसारख्या नागरी प्रश्नांवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. ‘पुणेकरांचे जीवन बिकट झाले आहे’ असे वक्तव्यही केले. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने हा ‘घरचा आहेर’ ठरला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांसाठी हे कोलीत मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

तीन नेत्यांमधील शीतयुद्धाचा भडका

पुणे शहरातील भाजपमध्ये खासदार कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तीन नेत्यांमध्ये शीतयुद्ध आहे. तिघांचेही कार्यक्षेत्र कोथरुड विधानसभा मतदार संघ आहे. यापूर्वीही खासदार कुलकर्णी यांनी काही प्रकल्पांना जाहीर विरोध केला आहे. बालभारती-पौडरस्ता रस्त्याला त्यांनी विरोध दर्शवत पर्यावरणप्रेमींची बाजू घेतली. कोथरुडमधील तात्यासाहेब थोरात उद्यानात मोनोरेल प्रकल्प राबविला जाणार होता. हा प्रकल्प मोहोळ यांचा होता. खासदार कुलकर्णी यांनी या प्रकल्पालाही विरोध केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर भाजपच्या महिला आघाडीने घैसास रुग्णालयाची तोडफोड करण्याची कृती योग्य नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याविषयीही पक्षाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाच्या विषयावरून बदनामीकारक फलक लागले, तरीही भाजपच्या नेत्यांनी कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर खासदार कुलकर्णी यांनी पुण्यातील नागरी प्रश्नांवरून जाहीरपणे टीका केल्याने भाजपमधील शीतयुद्धाचा भडका उडाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ पासून खदखद

खासदार कुलकर्णी या २००२ मध्ये त्या पहिल्यांदा पुणे महापालिकेत नगरसेविका झाल्या. त्यानंतर सलग तीनवेळा त्या निवडून आल्या. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून त्या निवडून आल्या. मात्र, २०१९ मध्ये त्यांना डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून खासदार कुलकर्णी यांच्या मनात खदखद आहे. २०२२ मध्ये त्यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांची राज्यसभेच्या खासदार पदी वर्णी लागली. त्यामुळे शहरातील भाजपमध्ये तीन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे.