पुणे : दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरासेवकांनी वारकऱ्यांसोबत वारीमध्ये सहभाग घेत रस्त्यावरील स्वच्छतेत हातभार लावला. भवानी पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर परिसरात ‘स्वच्छ’ कचरासेवकांनी शून्य कचरा निर्मितीचा संदेश गुरुवारी दिला.

करोना काळात स्वच्छतेच्या कामात खंड पडू न देता शहराच्या स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी झटणाऱ्या कष्टकऱ्यांनी २ वर्षानंतर झालेल्या झालेल्या वारीनिमित्त पदयात्रेत सहभाग घेतला. महानगरपालिकेसोबत ‘हरित वारी’ करण्यासाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोनही पालख्या भवानी पेठ भागामध्ये विसाव्यासाठी थांबतात त्या परिसराची स्वच्छता ठेवत कचरा वेचकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.  महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद, आरोग्य निरीक्षक संतोष कदम, मुकादम फिरोज कादरी यांच्या साथीने स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. वारकऱ्यांसोबत भजन गात, रस्त्याची स्वच्छता करत स्वच्छच्या कचरावेचकांनी वारीचा आनंद घेतला. त्याचबरोबर ‘सिंगल युझ प्लॅस्टिक बॅन कायद्या’ अंतर्गत पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या प्लाप्स्टिक विरोधात जनजागृती कचरासेवकांनी केली.

परभणी जिल्ह्यातून आलेल्या आणि गेली वीस वर्षे वारीत सहभागी होणाऱ्या द्वारकाबाई घुले यांनी कचरा कमी करण्यासाठी स्वतःची भांडी, ताट, वाट्या, तांब्या घेऊन वारीमध्ये सहभागी होते, असे सांगितले. विठ्ठलाच्या भेटीसाठी जाताना कचरा करणे योग्य नाही. स्वच्छता आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

लाखोंच्या संख्येने वारकरी मोठा प्रवास पायी करतात. वापरायला सोयीच्या छोट्या प्लास्टिक पाकिटांमुळे पर्यावरणास धोका पोहोचतो. तसेच परिसरात अस्वच्छता होते. वारीमध्ये पुनर्वापर आणि पुनःचक्रीकरण होऊ शकणाऱ्या गोष्टींचा वापर झाला तरच खऱ्या अर्थाने आपला नमस्कार माऊली चरणी पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– विमल ससाणे, कचरावेचक, भवानी पेठ, स्वच्छ संस्था