पुणे : पावसाळ्यात धरणातून नदीत पाणी सोडल्यानंतर तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नदीच्या पातळीत किती वाढ झाली, हे निश्चित करण्यासाठी महापालिकेने पुलांच्या खांबांवर पाणी पातळीच्या खुणा (मार्किंग) करण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला धरणापासून संगमवाडीपर्यंतच्या मुठा नदीवरील पुलांच्या खांबांवर या खुणा करण्यात येणार आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला हे आदेश दिले आहेत. यामुळे धरणातून नदीत किती पाणी सोडले की कोणत्या भागात पाणी शिरू शकते, याची माहिती महापालिका प्रशासनाला समजण्यास मदत होणार आहे. धरणातून विसर्ग केल्यानंतर. तसेच खुल्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीची पातळी नक्की किती वाढते, हे लक्षात यावे, यासाठी हे केले जाणार आहे. खडकवासला धरण ते संगमवाडीपर्यंत मुठा नदीपात्रातील विविध पुलांच्या खांबांवर या खुणा केल्या जाणार आहेत. यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नियोजन करणे सोपे होणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी नुकतीच शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यास काय नियोजन करायचे, याचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या विभागांची बैठक घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्याच वेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यंदाही मुठा नदीत अवघे दोन हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतर भिडे पुलावरून पाणी गेले. त्यामुळे पूरस्थितीचा नेमका अंदाज घेऊन भविष्यातील उपाययोजनांसाठी ही आखणी करण्यात येणार आहे, असे दिवटे यांनी सांगितले.
पाणीपातळीच्या खुणा करण्यात येणारे पूल
पुणे महापालिकेच्या हद्दीतील वारजे येथील बाह्यवळण मार्गावरील पूल, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील राजाराम पूल, म्हात्रे पूल, एस. एम. जोशी पूल, तसेच लकडी पूल, काकासाहेब गाडगीळ पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, टिळक पूल, नवा पूल आणि संगमवाडी पूल अशा प्रमुख पुलांवर या खुणा केल्या जाणार आहेत.
एकतानगरी, पाटील इस्टेट भागात ध्वनिक्षेपण यंत्रणा
पुराची पूर्वसूचना देण्यासाठी काही भागांत ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवली जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, पाटील इस्टेट या भागात ही यंत्रणा बसवली जाणार आहे.