01 December 2020

News Flash

‘देव रिटायर’ होईल?

‘फेडररचा सचिन होतो आहे का?’ हा अन्वयार्थ (६ सप्टेंबर) वाचला. त्यातले विचार नक्कीच पटण्यासारखे आहेत. सचिनने आता खरोखरच दोनशेव्या कसोटीचे निमित्त

| September 7, 2013 01:01 am

‘फेडररचा सचिन होतो आहे का?’ हा अन्वयार्थ (६ सप्टेंबर) वाचला. त्यातले विचार नक्कीच पटण्यासारखे आहेत. सचिनने आता खरोखरच दोनशेव्या कसोटीचे निमित्त साधून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली पाहिजे. सचिनने याबाबतीत विजय र्मचट आणि सुनील गावस्कर यांचे उदाहरण समोर ठेवले पाहिजे. इतकेच कशाला ज्याला सचिन आदर्श मानतो त्या विवियन रिचर्ड्सनेदेखील योग्य वेळी क्रिकेटचा निरोप घेतला होता.
सचिनने भरपूर आणि बरेच विक्रम केले आहेत. या विक्रमांनी आणि अर्थात सचिनच्या खेळाने त्याला देवत्व प्राप्त करून दिले आहे. क्रिकेट रसिकांनीच सचिनला मोठे केले आहे हे त्याने विसरता कामा नये. रसिकांनीच त्याला वेळोवेळी पाठबळ दिले आहे. तेव्हा सचिनने वाहते वारे पाहून चाणाक्षपणे योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. नाही तर देवालाच रिटायर करण्याची वेळ निवड समितीवर येऊ नये म्हणजे मिळवली!

फेडररचा सचिन होणार नाहीच, सचिनबाबतही चिंता नको!
‘फेडररचा सचिन होतो आहे का?’ हा अन्वयार्थ (६ सप्टेंबर) वाचून मनात विचार आला की, कोण एका खेळाला ‘धर्म’ बनवते? कोण एका खेळाडूला ‘देवा’ची उपमा देते? आपण जरी विसरत असलो की क्रिकेट हा एक खेळ आणि सचिन हा एक खेळाडूच आहे, तरी सचिन ही गोष्ट विसरलेला नसावा असे दिसते, कारण तो व्यावसायिक खेळाडूप्रमाणेच वागतो आहे. खेळातून निवृत्त होणे हा सर्वस्वी त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. आपल्या करिअरबाबत निर्णय घेण्याचा हक्क कोणत्याही अन्य व्यावसायिकाप्रमाणे त्यालाही आहे.
शिवाय, फेडरर ग्रँडस्लॅम जिंकला की स्वित्र्झलडमध्ये त्याच्या फोटोला घेऊन कुणी नाचत नाही किंवा हरला तर त्याच्या फोटोला आग लावत नाही.
म्हणून फेडररचा सचिन होणे कधीही शक्य नाही!
श्रीकांत गायकवाड, बीड.

सुखावणारे ‘रघुरामराज’..
‘रघुरामराज’ हा अग्रलेख (५ सप्टेंबर) वाचला. १९४३ मध्ये (तेव्हा ४७ वर्षांचे असलेल्या) सी. डी. देशमुख यांच्यानंतर ७० वर्षांनी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे तरुण व्यक्तीकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोपविली, त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेच. धोरणलकवा झाला व रुपया घसरला आणि भारत अडखळला ही प्रतिमा आता हळूहळू बदलेल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी. रघुराम राजन यांना असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील अनुभवाचा फायदा देशाला व्हावा अशी भली इच्छा सिंग सरकारला आहे, हेही नसे थोडके.
या नेमणुकीमुळे अर्थातच जादूची कांडी फिरणार नाही, परंतु आíथक परिस्थितीवर कठोर निर्णय घेण्याची जी राजकीय मानसिकता नाही, तिला काही प्रमाणात आळा बसेल हे त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवसावरून दिसले. बँकांच्या वाढत्या थकीत कर्जाचे उद्योगपतींकडे अडकलेले सहा लाख कोटी रुपये त्यांच्या आलिशान मालमत्तेमधून सोडविण्याचे प्रयत्न जरी झाले, तर आपले आíथक प्रश्न सोपे होतील. १९९१ साली नरसिंहन कमिटीच्या शिफारसींनुसार आíथक सुधारणा मनमोहन सिंग यांनी केल्या. याच काळात रुपया १८ टक्क्यांनी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरला होता. आताही परिस्थिती वेगळी नाही. त्यामुळे रघुराम राजन यांना किमान पंतप्रधान अनुभवाच्या चार युक्तीच्या गोष्टी सांगू शकतीलच. त्यात त्यांची प्रतिमा जर निवडणुकीच्या अगदी तोंडावर उजळली तर त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. अर्थात त्यासाठी त्या पक्षाला आपल्याच खजिनदारांचा रोष पत्करावा लागेल.
प्रवीण आंबेसकर, ठाणे

गुन्हा दाखल होऊनही माध्यमांना अभय?
‘कायद्यात काही जादूटोणा नाही’ हा अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला (लोकसत्ता ५ सप्टेंबर) ‘जादूटोणा, मंत्रतंत्र किंवा अघोरी विद्या यांना नव्हे तर त्यावर आधारित कृतींना या कायद्यात विरोध आहे’ हे त्यांचे निरीक्षणही पटले. मुळात अघोरी विद्या शिकलेला, मंत्र तंत्र करणारा हे तथाकथित ज्ञान हे कृती करण्यासाठीच मिळवतो, त्यामुळे असे मांत्रिक, तांत्रिक यांच्यावर नजर ठेवायला हवी. मुळात अध्यादेश निघाल्यानंतर तो कायदा म्हणून आता अस्तित्वात आला आहे. पण अजूनही या संबंधीचे पत्र, अधिकृत दस्तऐवज हे पोलिसांना मिळालेले नाहीत.
बुलढाण्यामध्ये अशाच अघोरी कृत्याचा पर्दाफाश करताना पोलिसांना या नव्या कायद्याची कलमे लावण्यास अडचणी आल्या, पण नांदेडमध्ये मात्र पोलिसांनी इंटरनेटवरून ती माहिती काढून घेऊन या नव्या कायद्याची कलमे आरोपींना लावली आणि राज्यातील पहिला गुन्हा या नव्या कायद्याखाली नोंदवला गेला.
पण अजूनही पोलीस या गुन्हेगारांच्या अघोरी उपायांची जाहिरात करणाऱ्या वृत्तपत्राविरुद्ध, स्थानिक वाहिनीविरुद्ध कारवाई करताना दिसत नाहीत. नांदेडमध्ये अशा जाहिराती प्रसारमाध्यमांद्वारेच करून गुन्हेगारांनी भोळ्याभाबडय़ा जनतेला लाखो रुपयांचा गंडा घातला. सरकारने प्रसार माध्यमांची याबाबतची नेमकी काय भूमिका असली पाहिजे आणि कायद्याने त्यांच्यावर कोणती बंधने आहेत, याचा शासन आदेश तातडीने काढावा आणि या अंधश्रद्धेच्या प्रसाराला आळा घालावा.
शिरीष धारवाडकर, औरंगाबाद

‘प्रौढत्वी’ शैशव आणि कवींचा पैसा..
‘वृद्धत्वी निज लक्ष्मीस जपणे’ हा अग्रलेख (६ सप्टें.) वाचला.  हे शीर्षक अन्वर्थक आहे; मात्र त्याच्या शेवटच्या परिच्छेदात ‘वृद्धत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे, हे आपल्याकडे गौरवाने सांगितले जाते. ते कवीपुरते ठीक. त्यांना कफल्लक राहणे परवडूही शकते’ असे विधान आहे. मुळात आपणास अभिप्रेत कवितेची ओळ केशवसुत रचित असून ती केवळ कवींना लागू नाही,तर सर्वसामान्यांना चपखल बसणारी आहे. केशवसुत म्हणतात,
प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे
तेव्हा वृद्धत्वी ऐवजी प्रौढत्वी असे अवतरण हवे होते. कवींनीही कफल्लक राहू नये हे व्ही. शांताराम यांनी नवरंग चित्रपटात एका पात्राच्या संवादातून फारच परिणामकारकपणे सूचित केलं आहे. ते पात्र कवी नवरंगाला ठणकावून सांगतं..
‘कविराजा, कविता की मत अब तान मरोडो
धंदे की कुछ बात करो..कुछ पैसे जोडो..’
महानुभाव साहित्यात ‘म्हातार दाम’ असा अन्वर्थक शब्द वाचनात आला होता. तो निवृत्तिवेतनाला पर्यायी शब्द म्हणून शोभण्यासारखा वाटतो.
प्रा. विजय काचरे, कोथरूड, पुणे

प्रश्न भाविकांचाच!
आसाराम बापू प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून आसाराम दोषी आहेत की नाही हे निकालांती स्पष्ट होईलच. मुख्य प्रश्न केवळ आसाराम नसून स्वयंघोषित सद्गुरू, धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या अशा व्यक्तींना समाजातील भाबडय़ा आणि पीडितांनी डोक्यावर बसवून स्वत:ला मूर्ख कुठपर्यंत बनवू द्यायचे हा आहे.    
नंदकिशोर पेडणेकर, अहमदनगर

नवसाचे स्वरूप बदला!
गणेशोत्सवात काही भक्त नवस बोलतात, हा शेवटी त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे असे नवस बोलणे योग्य वा अयोग्य या वादात न पडता या भक्तांनी काही सूचनांचा विचार करावा. नवस करताना देवापुढे अमुक वस्तू, पसे ठेवीन, चांदीच्या दुर्वा वाहीन असे नवस बोलण्यापेक्षा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करीन, गरीब मुलांच्या शाळेत फळवाटप करीन, वृद्धाश्रमात आठवडय़ातून एक तास जाऊन गप्पा मारीन, तिथे फळे-घरचा पदार्थ देईन, गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी मदत करीन, औषधे देईन असे नवस बोलल्यास नवस पूर्ण केल्याचे एक वेगळेच समाधान मिळू शकेल. सर्वाभूती भगवंत आहे असे संतवचन आहे, त्यामुळे या गोष्टींचा नवस बोलता येऊ शकेल.
कालिदास वांजपे, ठाणे

‘लोकमानस’साठी पत्रे ईमेलद्वारे पाठवायची नसल्यास टपालाचा पत्ता :
ईएल- १३८,  टीटीसी इंडस्ट्रियल एरिया,  एमआयडीसी महापे,  नवी मुंबई- ४००७१०
लोकसत्ता महापे कार्यालयाचा फॅक्स क्रमांक : ०२२- २७६३ ३००८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:01 am

Web Title: god can retired but sachin tendulkar wont
Next Stories
1 बलात्कार होणारच असतील तर..
2 हे कसे मिळवणार ‘आंतरराष्ट्रीय दर्जा’?
3 आंदोलकांचे आकडे पाहायचे की परिणाम?
Just Now!
X