31 May 2020

News Flash

बेहिशेबी संपत्तीमुळेच घराणेशाही बोकाळली

'अनुकंपेचे राजकारण' हा संकलित लेख   (२९ मार्च) वाचला. बडय़ा नेत्यांची बेहिशेबी संपत्ती हे घराणेशाही बोकाळण्याचे महत्त्वाचे कारण आहे . जवळच्या नातेवाईकांनाच त्या संपत्तीचा तपशील माहीत

| March 30, 2015 12:51 pm

‘अनुकंपेचे राजकारण’ हा संकलित लेख   (२९ मार्च) वाचला. बडय़ा नेत्यांची बेहिशेबी संपत्ती हे घराणेशाही बोकाळण्याचे महत्त्वाचे कारण आहे . जवळच्या नातेवाईकांनाच त्या संपत्तीचा तपशील माहीत असणार.  त्याच्या जोरावरच राजकीय पक्षाचा पािठबा मिळवता येतो हे उघड गुपित आहे . सगळेच उमेदवार ही काळ्या पशाची तीट लागलेले असतील तर लोकांना निवड करायला कोणाची तीट लहान दिसते ते पाहण्यापलीकडे फारसा वाव राहत नाही.  निवडणुकीला उभे राहण्यासाठी, पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी, निवडून येण्यासाठी अमर्याद पशाचे पाठबळ लागत असेल तर अशा मार्गाने निवडून आलेले उमेदवार त्या काळ्या पशाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील ही अपेक्षा भाबडेपणाची ठरेल.

धरणातील पाणीकपात करा
‘गोदावरी खोऱ्यात पुढील वर्षांपासून पायथा ते माथा’ असे धोरण राबविण्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. या धोरणानुसार प्रथम जायकवाडी धरण भरले जाईल आणि नंतर नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील धरण भरले जातील. मात्र अशा वेळी प्रत्येक वेळेस मान्सून सारख्या प्रमाणात पडत नाही. अशा वेळेला नाशिक-नगरमधील धरणातून पूर्ण पाणी जायकवाडीला सोडणे म्हणजे नगर-नाशिक जिल्ह्य़ांवर दुष्काळी परिस्थिती ओढवण्यासारखे होईल.
मात्र या धोरणाचा अवलंब करताना नाशिक व नगर जिल्ह्य़ांतील प्रत्येक धरणातील किती टीएमसीपर्यंत पाणीसाठा आहे याचा विचार करून पावसाळ्यातील कालावधीमध्ये पाणीकपात केली तर प्रत्येक वेळी धरण ओव्हरफ्लो न होता त्या मर्यादेपर्यंतच राहील. राहिलेले पाणी नदीपात्राद्वारे जायकवाडीकडे सोडण्यात येईल. पर्यायाने नाशिक न नगर जिल्ह्य़ांतील धरणे मात्र ओव्हरफ्लो होणार नाहीत. मात्र सातत्याने नदीपात्रातून कपात केलेले पाणी गेल्यास जायकवाडीतील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल आणि दोन्हीही प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.
 -सुभाष खटावकर, पाथर्डी (नगर)

क्रिकेटमधील गरप्रकारांबद्दल गंभीर होणे गरजेचे
‘हे तो बाजारपेठेची इच्छा’ हा अग्रलेख (२७ मार्च) आवडला. याच अनुषंगाने काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात.   आपल्या देशात क्रिकेटचा ज्वर खूपच गंभीर होत आहे, पण याकडे फारच दुर्लक्ष होत आहे. कोणती आवड किती जपावी यालाही काही मर्यादा असतात. क्रिकेटमध्ये देश खूप वाहवत चाललेला आहे, पण काही मंडळी यास पका अनेकपट करण्याचे साधन मानू लागलेले आहेत. यावर सरकारने नियंत्रण न मिळवल्यास देशावर निष्क्रियतेचे भले मोठे संकट कोसळेल. हे संकट ड्रग्जच्या नशेइतकेच वाईट असेल.
१९९३ च्या बॉम्बस्फोटांची चौकशी करत असताना पोलिसांना प्रथमच क्रिकेट बेटिंगचे पुरावे मिळाले. द. आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए, िवडीजचा सॅम्युअल, भारताचा अझरुद्दीन हे पोलिसांच्या  जाळ्यात सापडले होते. पण क्रोनिएचा विमान अपघातात मृत्यू झाला. सॅम्युअल व अझरुद्दीनला काही शिक्षा झाली नाही. २००७ साली पाकिस्तानचे प्रशिक्षक वुल्मर यांचा विश्वचषक स्पध्रेदरम्यान संशयास्पद मृत्यू झाला, याची काहीच चौकशी झाली नाही. क्रिकेटमधील या गरप्रकारांबद्दल गंभीर होणे गरजेचे आहे. अर्थव्यवस्थेतील खूप मोठा पसा असा व्यर्थ जाणे व त्यावर काहीच उपाय नसणे, ही एक शोकांतिका आहे. विशेष म्हणजे या काळ्या खेळातील सुमारे ९० टक्के पसा भारतातून जात आहे.
– सुहास एरंडे, पुणे              

धोका वेळीच ओळखा!
‘अनुकंपेचे राजकारण’ हे संकलन (रविवार विशेष, २९ मार्च) वाचले.  नेहरू यांच्या काळापासून हे अनुकंपेचे राजकारण सुरू झाले. अगोदर इंदिरा गांधी, मग राजीव गांधी आणि नंतर सोनियाजी.. फक्त काँग्रेस पक्षातच हे लोण न राहता अगदी सर्वच पक्षांत व सर्वच निवडणुकांमध्ये याची लागण झाली. परिणामी राजकारण हे चराऊ कुरण बनल्याने या सर्व संस्था, पालिका व यांचे मतदारसंघ म्हणजे घराण्यांची संस्थाने बनली.
आता तर एखादा नेता गेल्यावर नव्हे, तर जिवंतपणीच आपला राजकीय वारस नेमण्याची प्रथा पडली आहे.  कार्यकत्रे, समर्थकही केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी याची भलामण करतात, याला काय म्हणावे?   सिने, नाटय़ कलाकार अथवा गायक यांच्या घराण्यात स्वकर्तृत्वावर त्यांचे वारसदार कला पुढे नेतात. त्यातले काही यशस्वी होतात तर काही बाहेर फेकले जातात.
 राजकारणात मात्र हीच जनता त्यांच्या वारसांना त्यांचे काहीही कर्तृत्व, अनुभव नसताना डोक्यावर घेते. ‘लोकसत्ताची भूमिका’मध्ये म्हटल्याप्रमाणे, हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे; परंतु दुर्दैवाने आपल्या लोकांना याचे महत्त्व न कळल्याने तसेच भीती वा दहशतीपोटी कोणी याविरोधात आवाज उठवू शकत नाही. ‘लोकसत्ता’ ने या विषयावर आवाज उठवून वाचकांमध्ये जागृती निर्माण केली असून हे कार्य बहुमूल्य आहे.
 – किरण गुळुंबे, पुणे

जनतेचा विश्वासघात
दिल्लीकरांनी मोठय़ा विश्वासाने ‘आप’च्या हाती  सत्ता दिली. मात्र चांगला कारभार करण्याऐवजी आपचे नेते भांडत बसले असून कार्यकारिणीच्या बैठकीत हाणामारी करण्यापर्यंत नेत्यांची मजल गेली आहे. संयमी चेहरा आणि  लोकशाही प्रतिमा  दोन्हीही पक्षाने गमावले असून एक प्रकारे केजरीवाल यांनी जनतेचा विश्वासघात  केलेला  आहे.
विवेक तवटे, कळवा

बाजीराव पेशवे, गोखले मार्ग आणि सावरकर कॉलनी!
‘‘राजधानी दिल्लीतील ‘मराठी ठसा’’ हे पत्र (लोकमानस, २८ मार्च) वाचले. दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मराठी ठसा, शिवाजी महाराज, टिळक व आंबेडकर वगळता फक्त दोनच ठिकाणी – (सुनंदा भंडारे मार्ग आणि मावळंकर सभागार) दिसतो, असे पत्रलेखिकेने म्हटले आहे.
माझ्या माहितीत आणखी काही सन्मान्य अपवाद आहेत. एक, पेशवे पहिले बाजीराव यांचा. दिल्लीत पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव दिलेला रस्ता आहे. मार्च १७३७ मध्ये पहिल्या बाजीरावाने दिल्लीत यशस्वी धडक दिली होती. या लढवय्या पेशव्यांच्या नावाची पाटी दिल्लीच्या रस्त्यावर बघताना मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येते. याखेरीज गोपाल कृष्ण गोखले यांचेही नाव एका रस्त्याला आहे. वीर सावरकर कॉलनीसुद्धा आहे.
– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

गोरा साहेबही  आपल्याकडून काही शिकलाच!
‘वावदूकांची वायुबाधा’ हे शनिवारचे संपादकीय (२८ मार्च) वाचले. लोकशाही मूल्ये, संसदीय कार्यपद्धती, प्रशासकीय व्यवस्थेचा पाया, इंग्रजी भाषा ही सर्व गोऱ्या साहेबाची आपल्याला देन आहे असे म्हटले जाते. सत्तेची किंवा अधिकाराची हवा डोक्यात गेली, की पोलीस काय किंवा खाकी रंगाचा गणवेश घातलेला बसवाहक किंवा रिक्षावाला काय, सामान्य माणसाशी किती उर्मटपणे वागतात याचा अनुभव अनेक जणांनी  घेतलेला असतोच. असाच उर्मट भाषेचा वापर एका पोलिसाने केला, पण त्याच्या दुर्दैवाने समोरील व्यक्ती आमदार होती. त्या पोलिसाला विधानभवनात  चोप देण्यात आला होता, अशा बातम्या त्या वेळी वर्तमानपत्रांतून झळकल्या होत्या. बीबीसीच्या क्लार्कसनसाहेबांची मजल सहकाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत गेली होती हे वाचून साहेबही भारतीयांकडून इतक्या वर्षांत काही तरी शिकलाच असे वाटले. क्लार्कसनसाहेबांच्या लोकप्रियतेचा जराही मुलाहिजा न ठेवता त्यांना डच्चू देण्यात आला (आणि तोसुद्धा कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाशिवाय!) ही काळ्या ढगाची चंदेरी किनार म्हणावी लागेल. त्यातून आपणही काही शिकणे गरजेचे आहे.
 – प्रसाद दीक्षित, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2015 12:51 pm

Web Title: political dynasties come up with illegal property
Next Stories
1 इराणींचा राजीनामा घ्यावा
2 माहिती आयोगाची अक्षमता, राजकीय पक्षांची मुजोरी..
3 बंदिप्रियतेची कानटोचणी
Just Now!
X