भारतातील सर्वाधिक खपाचे, विक्रमाचे आणि चर्चेचा विषय असलेले सध्याचे लेखक म्हणजे कादंबरीकार चेतन भगत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कादंबरीची सध्या भारतभर जोरदार चर्चा आहे. तिच्या बाजूने आणि विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये, ब्लॉगवर बरेच काही लिहिले जात आहे. त्यासोबत तिच्या विक्रीचा आलेखही दिवसेंदिवस वाढतोच आहे. ही कादंबरी आणि चेतन भगत यांच्याविषयीचे हे लेख. डावीकडील लेख थेट कादंबरीच्या कथानकाविषयी बोलणारा, तिची चिकित्सा करणारा आहे, तर उजवीकडील लेख चेतन भगत यांच्या जादूई करिश्म्याविषयी. हा लेख हिंदीतील वाचकप्रिय ब्लॉग ‘जानकीपुल डॉट कॉम’वरून लेखकाच्या पूर्वानुमतीने अनुवादित करून घेतला आहे.  या दोन्ही लेखातून चेतन भगत यांच्याविषयी जाणून घ्यायला आणि त्यांच्या यशाचे गमक समजायला मदत व्हावी.

चेतन भगत यांची नवी कादंबरी ‘हाफ गर्लफ्रेंड’ची नोंदणी ऑगस्टमध्ये केली होती; ऑक्टोबरमध्ये ती प्रकाशित होताच मलाही मिळाली. कादंबरीतील त्यांच्या परिचयामध्ये लिहिले आहे की, ‘त्यांच्या सहा ‘ब्लॉकबस्टर’ कादंबऱ्या लिहून झाल्या आहेत.’ ते कदाचित भारतातले पहिले लेखक असावेत – ज्यांनी ‘बेस्टसेलर’ला ‘ब्लॉकबस्टर’मध्ये बदलवलं. त्यांची तुलना भारतातल्या कुठल्याही लेखकाशी केली जाऊ शकत नाही. प्रत्यक्षात ते ‘लेखनजगतातले सलमान खान’ आहेत. त्याचा प्रत्येक चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच शेकडो कोटी रुपयांच्या कमाईला सुरुवात होते. सलमान खानसारखा त्यांचा सामना कमाईच्या बाबतीत इतर कुणाशी न होता त्यांच्या स्वत:च्याच आधीच्या कादंबरीशी होतो. सलमान खान अभिनेता नाहीत, फिनॉमिनन आहेत. चेतन भगतही लेखक नाहीत, फिनॉमिनन आहेत. त्यांनी मॅनेजमेंट, आयआयटीमध्ये शिकलेल्या तरुणांना लेखनाच्या रूपाने एक नवीन बिझनेस मॉडेल दिले, ज्यात चोख कमाई आहे, ग्लॅमर आहे. तसेही अमेरिकेतील फास्ट कंपनी त्यांना व्यवसाय क्षेत्रातील जगातल्या शंभर रचनात्मक लोकांपैकी एक मानते. सलमान खान यांनी चित्रपटाला यशस्वी बिझनेस मॉडेल बनवले, तर चेतन भगत यांनी लेखनाला.
तुम्ही म्हणाल की, मी सुरुवात चेतन भगत यांची नवी कादंबरी ‘हाफ गर्लफ्रेंड’ने केली होती. तेव्हा अजून एक गोष्ट  विचारतो की, सलमान खानचे १०० कोटी-२०० कोटी व्यवसाय करणारे चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या-माझ्यासारख्या प्रेक्षकांना काय मिळते? चेतन भगत वाचतानाही कळते ते एवढेच की, यशस्वितेचा हा आणखी एक नवा फॉम्र्युला आहे. आणि खरे सांगू का, चेतन भगत प्रत्येक वेळी एक असा नवा फॉम्र्युला देऊन जातात, की वाचणारे त्याचे सूत्र शोधतच राहतात.
‘न्यूयॉर्क टाइम्स’चे म्हणणे आहे की, चेतन भगत भारतातले आतापर्यंतचे सर्वाधिक विकले जाणारे लेखक आहेत. ते या कादंबरीने आणखीच सिद्ध होईल. ‘हाफ गर्लफ्रेंड’च्या कहाणीवर येतो. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटापासून सीक्वेन्सवर आधारलेल्या पटकथांवर मोठय़ा प्रमाणावर चित्रपट बनवले जाऊ लागले. या कादंबरीची कथाही सीक्वेन्समध्ये आहे. पाटण्यातील चाणक्य हॉटेलमध्ये लेखकाला डुमरावच्या खस्ताहाल संस्थानाचा राजपुत्र माधव झा भेटतो. त्यानंतर कहाणी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश करते- जिथे माधव झा बास्केटबॉल कोर्टवर असतो. तिथे रिया सोमाणी त्याच्या आयुष्यात येते, नंतर निघून जाते.
कहाणीचा दुसरा सीक्वेन्स डुमरावमध्ये घडतो. माधव झा आपली आई राणी साहिबा यांच्या शाळेत काम करण्यासाठी एचएसबीसीच्या पन्नास हजारांच्या नोकरीवर लाथ मारून परत येतो. त्याच्या शाळेची स्थिती सुधारण्यासाठी बेल गेट्स यांचा दौरा होणार असतो. त्यासाठी माधव इंग्रजीत भाषण देता यावे म्हणून इंग्रजी शिकण्यासाठी पाटण्यातील एका कोचिंग क्लासमध्ये दाखल होतो. (कमाल आहे बंदा स्टीफन्समध्ये शिकूनसुद्धा इंग्रजी शिकू शकला नाही. तिथून विज्ञान शाखेत पदवी मिळवणारे माझे मित्रही मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलत.) आणि चमत्कार होतो. रिया आपल्या दीड वर्षांच्या लग्नबंधनातून सुटका करून घेऊन पाटण्याला येते आणि माधवला इंग्रजी शिकवते. ज्या दिवशी त्याला त्याच्या इंग्रजी भाषणाचे फळ म्हणून बिल गेट्स यांच्याकडून शाळेसाठी देणगी मिळते त्याच दिवशी ती गायब होते.
कादंबरीतील तिसरा सीक्वेन्स आहे न्यूयॉर्कमधील. डुमरावहून माधव झा रियाचा शोध घेत तिथे येतो. जाण्याआधी रिया एक चिठ्ठी सोडून गेलेली असते आणि पहिल्यांदा त्याला ‘आय लव्ह यू’ म्हणालेली असते. मग आपल्या पहिल्या आणि सच्च्या प्रेमाच्या शोधात नायक न्यूयॉर्कला जाणारच ना! माधवला याची कल्पना असते की, आई-वडील, पती यांच्या संपत्तीवर पाणी सोडून न्यूयॉर्कमध्ये एका रेस्तरामध्ये गायक बनण्याचे रियाचे स्वप्न असते. बस्स, बंदा तीन महिन्यात आपले सच्चे प्रेम मिळवतो.
ही आहे, एक ब्लॉकबस्टर कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाच्या नव्या ब्लॉकबस्टर कादंबरीची कहाणी. त्यात एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची पुरेपूर शक्यता आहे. इकडे मी ‘हाफ गर्लफ्रेंड’वर लिहितो आहे आणि तिकडे टीव्हीवर बातमी येत आहे की, या कादंबरीवर चित्रपट होणार आहे. माधव झाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर वा रणवीर सिंग यांच्याशी बोलणी चालू आहे.
हाफ गर्लफ्रेंडला पूर्ण बायको बनवण्यासाठी आजकाल खूप खटपटी-लटपटी कराव्या लागतात; पण एक आहे, बंद्याने अभ्यास चांगला केला आहे. लिट्टी चोखा खाण्यासाठी तो मौर्या लोकमध्ये जातो- जिथे खरोखरच खूप चांगला लिट्टी चोखा मिळतो. पण डुमरावच्या राजाला बनवून भगतबाबू चूक करून बसले; पण फिक्शनमध्ये सब चलता है.
२६० पानांच्या कादंबरीची हीच गंमत असते. कादंबरी तीच वाचायला हवी, जी दिल्ली-पटणा या दीड तासाच्या विमान प्रवासात वाचून होईल. तिची किंमत कमी असेल आणि ड्रामा, मेलोड्रामा त्यात एकत्रित असेल. त्यातील स्थळे विदेशी असतील. सुशीपासून लिट्टी चोखापर्यंत सगळे काही असेल. ज्यात पाटण्यातील चाणक्य हॉटेल असेल. गावापासून न्यूयॉर्कपर्यंतच्या आयुष्याचा रंगीत पट असेल. आता १४९ रुपयांच्या कादंबरीत काय काय येणार? इतके सगळे एका कादंबरीत देणाऱ्या चेतन भगतबाबा यांचा जय असो.
तसे आणखी काही दिलेले असो वा नसो, भगतबाबांनी चित्रपटाच्या एखाद्या लोकप्रिय संवादासारखा नव्या पिढीला एक नवा वाक्प्रचार तर दिला आहेच- ‘हाफ गर्लफ्रेंड’.

मराठी अनुवाद – राम जगताप
 हाफ गर्लफ्रेंड : चेतन भगत
रुपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली
पाने : २६८
किंमत : १७६ रुपये.
(सवलतीत – ९९ रुपये)