वास्तविक कोणी कोणाच्या हातून कोणत्या कारणांसाठी सत्कार स्वीकारावा यात अन्य कोणास नाक खुपसण्याचे कारण नाही. पण..
यापुढे कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचे सांगणाऱ्या अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्षांकडून असा सत्कार ‘कोणाच्याही’ हस्ते स्वीकारला जाणार असेल, जातीपुरती मर्यादित ओळख सांगणाऱ्या संस्थेचा सत्कार जागतिक कर्तृत्व असलेल्यांकडून स्वीकारला जाणार असेल, तर प्रश्न पडणारच..
अन्य कोणत्याही समाजाप्रमाणे भारतीय समाजदेखील विसंगतींनी भरलेला आहे हे खरे असले तरी काही विसंगती वा विरोधाभास हे आपल्या सामाजिक आणि बौद्धिक नैतिकतेवर प्रश्न निर्माण करतात. या अशा प्रश्नांची संख्या आणि उदाहरणे जितकी जास्त तितकी त्या समाजाच्या प्रगतीची गती मंद, असे हे साधे समीकरण. सांप्रतकाळी या विरोधाभासाची उदाहरणे हवी तितकी आढळत असली तरी त्यातून आवर्जून दखल घ्यावी इतकी महत्त्वाची दोन. हे दोन्हीही सत्कार आहेत. पहिला आहे आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा आणि दुसरा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, मराठी समाजाचे दीपस्तंभ म्हणावेत असे डॉ. जयंत नारळीकर यांचा.
प्रथम फादर दिब्रिटो यांच्याविषयी. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्याचे आम्ही स्वागत केले. त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे दिब्रिटो यांची साहित्यिक आणि जगतानाची मूल्ये यांत काही एक असलेले साहचर्य. साहित्य पर्यावरणाचे गोडवे गाणारे आणि प्रत्यक्ष जगणे वृक्षतोडीवर आधारित असे अनेकांच्या बाबत होत असते. दिब्रिटो त्यास काही प्रमाणात अपवाद. ते ओळखले जातात ते त्यांची कर्मभूमी असलेल्या वसईतील पर्यावरण रक्षणार्थ त्यांनी दिलेल्या लढय़ासाठी. दिब्रिटो यांचे लिखाण प्राधान्याने पर्यावरणविषयक आहे. त्या पर्यावरणाच्या रक्षणार्थ त्यांनी केलेला संघर्ष हा त्यांच्यातील साहित्यिकास मोठेपणा प्राप्त करून देतो. म्हणजे त्यांची ही क्रियाशीलता त्यांच्यातील साहित्यिक कलात्मकतेस झाकोळून टाकते. तसे व्हायला हवे की नको, कला महत्त्वाची की क्रियाशीलता आदी प्रश्न खरे असले तरी दिब्रिटो यांच्याबाबत हे वास्तव आहे हेही तितकेच खरे. या पर्यावरण रक्षणार्थ दिब्रिटो यांनी काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांशी दोन हात केले. हा त्यांच्यातील साहित्यिकापेक्षा अधिक कौतुकाचा भाग. याचे कारण आपले साहित्यिक सर्वसाधारणपणे जागतिक स्तरावर कोणी कसे आणि काय करायला हवे, याचा सल्ला देण्याचे शौर्य गाजवतात आणि गल्लीतील सत्तांधांशी लाळघोटेपणा करण्यात धन्यता मानतात. दिब्रिटो यांनी तसे केले नाही.
पण साहित्य संमेलनाध्यक्षपद मिळाल्यानंतर मात्र त्यांच्यातील लेखकाचा लेखकराव झाला की काय, असा प्रश्न पडतो. तो पडण्याचे कारण म्हणजे त्यांनी स्वीकारलेला ताजा सत्कार. वास्तविक कोणी कोणाच्या हातून कोणत्या कारणांसाठी सत्कार स्वीकारावा यात अन्य कोणास नाक खुपसण्याचे कारण नाही. पण सत्कार स्वीकारणारी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष असेल आणि आयुष्याच्या पूर्वार्धात ज्या विरोधात उभी राहिली त्यांच्याच हस्ते गौरव स्वीकारत असेल तर मात्र हा मुद्दा निश्चित भुवया उंचावणारा ठरतो. त्याची तुलनाच करायची तर निवडणूकपूर्व काळात अजित पवार यांना खलनायक ठरवून निवडणुकोत्तर सत्ताप्राप्तीसाठी उपमुख्यमंत्री पद देऊ करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी करता येईल. किंवा त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘प्रतिगामी’ शिवसेनेविरोधात फुकाचे आकांडतांडव करून अखेर त्यांच्या पायाशी लोळण घेणाऱ्या शूर पुरोगामी पत्रपंडिताचे स्मरण होईल. तसे होणे नैसर्गिक. त्यात परत आपण कोणाकडूनही सत्कार स्वीकारणार नाही, असे जाहीर विधान करणाऱ्या दिब्रिटो यांच्याकडूनच असा ‘कोणाच्याही’ हस्ते सत्कार स्वीकारला जाणार असेल तर ते निश्चितच त्यांच्या मूल्याग्रहाविषयी प्रश्न निर्माण करणारे ठरते. या मंचावर पुरोगामी म्हणून ओळखले जाणारे चार कवी-लेखक होते. यजमान कोण आहे हे पाहणे यांच्या पुरोगामित्वात बसत नाही काय? सत्कार घेणार नाही, घेणार नाही म्हणत शाली गोळा करत हिंडायचे आणि ज्यांच्या विरोधात लढण्याचा मोठेपणा स्वीकारायचा त्यांच्याच हातून किंवा साक्षीने कौतुक करवून घ्यायचे ही कोणती नैतिकता?
अशी पुरोगामी नैतिकता राष्ट्रीय पातळीवर मिरवणाऱ्या दिल्लीस्थित आणि त्याच्या बोटास धरून चंचुप्रवेश करू पाहणाऱ्या मुंबईवासीय अशा दोन पुरोगाम्युत्तम पत्रकारांनी २०१४च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात सुरेश प्रभू आणि मनोहर पर्रिकर यांचा समावेश झाला म्हणून समाजमाध्यमांतून आनंदोत्सव केला होता. का? तर आपल्या ‘ज्ञाती’तील दोन दोन मंत्री झाले म्हणून. या दोघांचाही भंपकपणा असा की एकाच वेळी मोदी ‘यांच्यासारखी’ व्यक्ती पंतप्रधान झाली म्हणून दुखवटा पाळायचा आणि त्याच वेळी ‘आपल्या ज्ञाती’तील दोघांना त्यांच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले म्हणून गुढय़ातोरणे उभारायची. तरीही वर पुरोगामी म्हणून मिरवायचे.
तथापि असा वैचारिक तोतरेपणा जयंत नारळीकर यांनी कधीही केलेला नाही. त्यामुळे या अशा पोरकट पुरोगाम्यांच्या तुलनेत नारळीकरांची पुण्याई किमान सहस्रपटींनी अधिक आहे. प्रखर अभ्यासांती आपल्याला उमगलेली वैज्ञानिक गुह्य़े अत्यंत प्रांजळपणे जनसामान्यांसमोर मातृभाषेत मांडण्याची मोठी पुण्याई नारळीकरांची. त्यांचा साधेपणा आणि निगर्वी वृत्ती तर अत्यंत आदरणीय अशी. भाभा अणुशक्ती केंद्रातील कारकुनासही वैज्ञानिक संबोधण्याच्या आणि त्यानेही ते खरे मानून बोलभांडकी करण्याच्या आपल्या वैज्ञानिक वास्तवात खगोलशास्त्रातील काही सिद्धांत नावावर नोंदले जाण्याइतका मोठेपणा अंगी असूनही नारळीकर खऱ्या अर्थाने ‘मरतड जे तापहीन’ असे ठरतात.
आणि म्हणूनच त्यांनी असा ज्ञाती मर्यादित सत्कार स्वीकारणे वेदनादायक ठरते. नारळीकर काही एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून मोठे नाहीत. हे खरे की त्या समाजात जन्मास येण्याने काही एक आघाडी मिळते. पण म्हणून त्या समाजातील सर्वच काही नारळीकर होतात असे नाही. किंबहुना न होणाऱ्यांचीच संख्या अधिक. पुरोगाम्यांचा खोटेपणा जितका वात आणणारा असू शकतो तसा केवळ कोणा एका जातीत जन्मास आले म्हणून मोठेपणा मिरवणाऱ्यांचा खरेपणा तापदायक ठरू शकतो. अशा वेळी एक मर्यादित ज्ञाती वा जातीपुरतेच कार्य करणाऱ्या संस्थेकडून काही एक पुरस्कार स्वीकारणे कितपत योग्य? कर्तृत्व हे कोणत्याही एका जातीपुरतेच मर्यादित असू शकत नाही, हे वैज्ञानिक सत्य. एखाद्या विशिष्ट जमातीत जन्मास येणे यात ‘गर्व से..’ चित्कारावे असे काही नाही, हे सत्य नारळीकरांनाही मान्य असेल. तेव्हा मग त्यांनी हा जातीपुरती मर्यादित ओळख सांगणाऱ्यांचा सत्कार कसा काय स्वीकारला? की त्यांच्या ऋजूपणामुळे त्यांनी त्यास होकार दिला? या सत्कार समारंभात नारळीकरांनी विज्ञानप्रसारासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज व्यक्त केली. ते रास्तच. पण जात ही संकल्पना विज्ञानात बसते का? कदाचित असेही असेल की इतका विचार नारळीकरांनी केलाही नसेल. पण तसा तो न करणे योग्य होते काय? समाजातील यशवंतांना ‘आपले’ वा ‘आपल्यापैकी’ म्हणून जाहीर करण्याकडे अनेकांचा कल असतो. मग त्या अशा संस्था असोत वा राजकीय पक्ष. तसा तो करणाऱ्यांना दोष देता येणार नाही. पण म्हणून तो गौरवमूर्तीनी करू द्यावा का, हा प्रश्न आहे.
तो विचारल्याबद्दल समाजातील वा समाजमाध्यमांतील अनेक अर्धवटरावांना पोटशूळ उठेल. पण समाजकारण असो वा विज्ञान. असे मुद्दे चर्चिले जाणे आवश्यक असते. त्यातून होणारे सामाजिक अभिसरण हे समाजास पुढे नेते. नारळीकरांबाबत असा प्रश्न विचारणे म्हणजे त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करणे नव्हे हे तेदेखील जाणतात. म्हणूनच तो विचारायचा.
या प्रश्नाचे उत्तर आपल्या सामाजिक प्रगतीशी संबंधित आहे आणि साहित्यिक तसेच मूठभरच असलेले वैज्ञानिक यांच्यावर या प्रगतीची मदार आहे. तेव्हा समाजाचे बौद्धिक नेतृत्व करणाऱ्यांनी तरी ही अशी सत्कारमाया टाळावयास हवी.