बंदुकीची एकही गोळी झाडता पाकिस्तानला जखमी करता येणे शक्य व्हावे, असे उपाय मोदी यांच्या सरकारने आता सुरू केले आहेत..

आंतरराष्ट्रीय करार मोडून भारत जगामध्ये खलनायकत्व स्वीकारू इच्छित नसला, तरी या कराराद्वारे भारताच्या वाटय़ाला मिळणारे सर्व पाणी अडवण्यासाठी आता प्रयत्न होणार आहेत. तीच बाब मोस्ट फेवर्ड नेशनदर्जाची. त्यामुळे लगोलग पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडेल असे नाही. पण धाबे दणाणेल..

संयुक्त राष्ट्रात नुसती भाषणे देऊन काहीही साध्य होणार नाही, ही शिवसेनेची टीका त्यांच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या आकलनास साजेशी अशीच आहे. यापूर्वी देशात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन पक्ष दिसत. शिवसेनेचे लोकशाही व्यवस्थेतील योगदान हे की त्यांनी सरकारीविरोधक अशी एक नवी संकल्पना जन्मास घातली आहे. तेव्हा त्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या बाकावर बसून शिवसेना अशा प्रकारची ऊरबडवेगिरी करताना दिसत आहे. ही बाब एरवी दुर्लक्ष करण्याच्याच लायकीची. परंतु उरी हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला युद्धज्वर भडकवण्याचे काम अशी वक्तव्ये करीत असतात. तेव्हा त्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सोमवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भाषण केले. ते उत्तम झाले. संयुक्त राष्ट्रांची आमसभा म्हणजे निवडणुकीतील प्रचारसभा नव्हे. ते भान स्वराज यांनी राखले. त्यामुळे आपल्याकडील मातृभूमी-प्रेमाने भारलेल्या स्वयंघोषित राष्ट्रवाद्यांची नक्कीच निराशा झाली असेल. टीआरपीप्रेमातून राष्ट्रप्रेमाचे हॅशटॅग चालविणाऱ्या काही चॅनेलीय बुभुक्षितांना तर स्वराज यांनी पाठीत खंजीर वगैरे खुपसल्याचीही भावना झाली असेल. कारण त्या भाषणाच्या आधी, सुषमाजी पाकिस्तानवर कसे बॉम्ब टाकणार वगैरे बाता या वाहिन्यांनी मारून झाल्या होत्या. त्या फोल ठरल्या आणि स्वराज यांनी कोणत्याही प्रकारचे शाब्दिक आकांडतांडव न करता पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा दुटप्पीपणा जगासमोर मांडला. त्यांच्या या भाषणाची दोन लक्ष्ये होती. एक अर्थातच पाकिस्तान आणि दुसरे आंतरराष्ट्रीय समुदाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझिकोडेमधून थेट पाकिस्तानी जनतेला त्या देशातील सरकारच्या नीतींविरोधात लढण्याचे आवाहन केले होते. तो मुद्दा सध्याच्या संदर्भातही औचित्यहीनच होता. परंतु तरीही त्याकडे मानसिक युद्धाचा – सायवॉरचा – एक भाग म्हणून पाहता येईल आणि स्वराज यांचे हिंदी भाषण हा त्याचाच पुढचा टप्पा मानता येईल. पाकिस्तानी जनतेपर्यंत पोहोचणे हा त्यांच्या हिंदी भाषणाचा एक हेतू होता. तो किती साध्य झाला हे समजावयास मार्ग नाही. मात्र पाकिस्तानातील आंग्ल दैनिकांनीही त्यांच्या भाषणास आतील पानावर ढकलले हे पाहता तो बार फुसकाच ठरला. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मात्र त्यांनी भारताची काश्मीरविषयक भूमिका अत्यंत ठामपणे मांडली. त्यातून पाकिस्तानी अपप्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो तसाच राहील ही भूमिका भारत या व्यासपीठावरून सातत्याने मांडत आहे. स्वराज यांनी तिचा पुनरुच्चार केला. आता या भाषणातून काय साध्य झाले, पाकिस्तानला एकटे पाडण्यात भारताला यश आले का, असे कुत्सित प्रश्न विचारता येणे शक्य आहे. परंतु आमसभा म्हणजे काही कुस्तीचा आखाडा नसतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे कुणाच्या कार्यालयात घुसून केलेली राडेबाजी नसते. ती शांततेने, चिकाटीने, मुत्सद्दीपणे चालणारी एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. ती पूर्वीही सुरू होती आणि आजही सुरू आहे. फरक एवढाच पडला आहे की, पूर्वी अशा प्रक्रियेविरोधात शाब्दिक हैदोसदुल्ला करणारे आज तिचे गुणगान करताना दिसत आहेत. मात्र त्याबद्दल त्यांना दोष देण्याचे वा त्यांच्यावर टीका करण्याचे काहीच कारण नाही. उलट ‘दुरुस्त आये’ म्हणत सर्वानीच या बदलाचे स्वागतच केले पाहिजे.

या भूमिका बदलाचे खरे श्रेय जाते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. उरी हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानसारख्या जागतिक संदर्भही हरवलेल्या देशाच्या नावाने भारतीय नेत्यांकडून ऊरबडवेगिरी सुरू झाली होती. मोदी यांचे काही उल्लूमशाल सहकारी दाताच्या बदल्यात जबडा तोडण्याची भाषा करून आपल्या आकलनशक्तीचा उतरलेला आलेखच मिरवीत होते. मोदीभक्त नावाची एक नवी जमात सध्या समाजमाध्यमांत धुमाकूळ घालत असते. ती तर युद्धज्वराने तापली होती आणि मोदी यांची वक्तव्ये त्या तापाचा पारा वर नेण्यात साह्य़भूत होत होती. वस्तुत: मोदी यांनी पाकिस्तानबरोबर आधी केलेली ‘साडीचोळीची डिप्लोमसी’ जेवढी पोकळ होती, तेवढय़ाच पाकिस्तानला जशास तसा जवाब देण्याच्या धमक्याही. परंतु आपल्या चलाख शब्दकळेवर फिदा असलेल्या भगतगणांच्या आनंदासाठी मोदी तशी भाषा करीत असावेत. वास्तविक युद्ध म्हणजे व्हिडीओगेम नसतो. वाटते तितके ते सोपे नसते, याची जाणीव त्यांनी या भगतगण आणि गणंगांना करून देणे आवश्यक होते. तसे झाले नाही. त्यामुळेच मग गुजरातमधील शिवसैनिक आपण मानवी बॉम्ब बनण्यास तयार आहोत वगैरे वल्गना करीत लोकांची माथी भडकवीत राहिले आणि संघपरिवारातील काही वांड संघटना लष्करभरतीचे मेळावे भरविण्याच्या कामाला लागल्या. युद्धज्वर पसरवून आपले द्वेषाचे राजकारण पुढे नेण्याचाच हा प्रकार. मोदी यांच्या भूमिकाबदलामुळे त्यांच्यावर आता मवाळपणाचा शिक्का मारला जाईल. त्यांचेच भगतगण आणि शिवसेनेसारखे सरकारी विरोधक आता त्यांच्या छातीचे माप काढण्याच्या उद्योगाला लागतील. समाजमाध्यमांतून तर आधीपासूनच मोदी यांची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी होऊ लागली आहे.

परंतु मुत्सद्देगिरीच्या मार्गानेच पाकिस्तानला योग्य तो धडा शिकविता येणे शक्य आहे याची पुरेशी जाणीव मोदी सरकारला झाल्याचे स्वराज यांच्या भाषणाप्रमाणेच मोदी यांच्या ताज्या कृतींतून दिसत आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. यातील पहिली कृती सिंधू पाणीवाटप कराराबाबतची आहे. सिंधू पाणीवाटप करार रद्द करून भारत पाकिस्तानचे पाणी तोडणार आहे, असा जोरदार प्रचार सध्या पाकिस्तानी माध्यमांतून सुरू आहे. वस्तुत: तसे इतक्यात होण्याची शक्यता नाही. याचे कारण, आंतरराष्ट्रीय करार मोडून भारत जगामध्ये खलनायकत्व स्वीकारू इच्छित नाही. या कराराद्वारे भारताच्या वाटय़ाला मिळणारे सर्व पाणी अडवले तरी पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी जाणार आहे, हे निश्चित. या दृष्टीने मोदी सरकारचे प्रयत्न मात्र सुरू झाले आहेत. हीच बाब पाकिस्तानला देण्यात आलेल्या ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ किंवा प्राधान्य-राष्ट्र या दर्जाच्या फेरविचाराची. यापुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार विभाग – साफ्ता कराराद्वारे पाकिस्तानला मिळत असलेल्या सवलती रद्द करण्याबाबतही विचार करता येणार आहे. पाकिस्तानचे आíथक कंबरडे यातून मोडेल असे नाही. परंतु बंदुकीची एकही गोळी न झाडता त्याला जखमी करता येणे यातून शक्य होणार आहे.

नाक दाबून तोंड फोडण्याची ही रणनीती आहे. यातून देशातील बहुसंख्यांना हाणामारीचे समाधान कदाचित मिळणार नाही. वाहिन्यांतील वृत्तबुभुक्षित ध्वनिक्षेपकधारी शूरवीरांची स्टुडिओत बसून लढाई-लढाई खेळण्याची खुमखुमी कदाचित भागणार नाही. द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांचे मनसुबे तडीस जाणार नाहीत. मात्र हे सारे अंतिमत: देशहिताचेच असेल. मोदी आणि मंडळींना याची जाणीव झाली हे बरे झाले. आता ती समाजातही झिरपली पाहिजे. राष्ट्रीय पौरुषत्व म्हणजे युद्ध ही कल्पना बाद करण्यात आता मोदी आणि मंडळींनीच पुढाकार घेतला पाहिजे. त्यांची आधीची वक्तव्ये ही या वाटेतील सर्वात मोठा अडथळा असेल. परंतु तरीही प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा समाजाच्या अंगात मुरलेला युद्धज्वर आता शांत झाल्याचे दिसत असले, तरी तो केव्हाही उफाळून वर येईल. त्या वेळी तो शमवणे अधिक अवघड ठरेल