मध्ययुगापासून सत्तेची, ताकदीची, शौर्याची, पौरुषाची मानली गेलेली प्रतीके आजही आपल्याला सतत सार्वजनिक ठिकाणी कोणत्या हेतूंसाठी मिरवायची आहेत?

आजकाल प्रत्येकाच्या हातात दिसणारा मोबाइल फोन हे केवळ आधुनिकतेचे प्रतीक नाही, तर व्यक्तिस्वातंत्र्याचेही प्रतीक आहे. मग तसे व्यक्तिस्वातंत्र्य आपण मानतो का?

जोसेफ सिरिल बामफोर्ड नावाच्या कुणा ब्रिटिश उद्योजकाच्या ‘जेसीबी’ कंपनीचे, ‘बुलडोझर’ या नावाने ओळखले जाणारे यंत्र सध्या आपल्याकडे फार मानाचे स्थान पटकावून आहे. या यंत्राने बुलडोझर बाबा, बुलडोझर मामा अशी नातीही निर्माण करायला सुरुवात केली आहे. हवे तिथे बाबा-मामा करत नको तिथे आपला वचक कसा निर्माण करता येतो, त्याचा या यंत्राने अलीकडेच घातलेला पायंडाही चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरून सगळय़ा देशाने नुकताच बघितला. गोष्ट त्याच्याही चारदोन दिवस आधीची. त्याच ठिकाणची. जहांगीरपुरीतील कथित दंगलीच्या निषेधार्थ निघालेल्या रथयात्रेत अवघी १८-१९ वर्षांची पोरे हातात नंग्या तलवारी घेऊन सामील झाली होती. दुचाकींवर बसून अशी पोरे आणि बाप्ये घोषणा देत तलवारी परजत निघाले आहेत, हे दृश्य मोठे ‘मनोरम’ होते. आमच्या या तलवारी स्वसंरक्षणार्थ आहेत, आमच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही त्या वापरू असे ती अजून मिसरूडही न फुटलेली पोरे टीव्ही वाहिन्यांना सांगत होती. या वयात ज्यांच्या हातात पुस्तके असायला हवीत, ज्यांनी आपल्या भवितव्याची वाट चालायला हवी, त्यासाठीची सगळी शारीरिक, बौद्धिक, मानसिक गुंतवणूक करायला हवी, त्या मुलांच्या हातात या तलवारी. त्या असल्या म्हणून काही बिघडत नाही, तलवार हे तर स्वसंरक्षणाचे पारंपरिक प्रतीक, हे या मुलांचा समावेश ज्या मिरवणुकीत होता, त्यातील साऱ्याच सहभागींना जणू पटलेले असावे. हा प्रतीकांचा वापर आता भलताच शक्तिशाली होताना दिसतो.

म्हणजे असे की प्रतीक म्हणूनही आपल्याला एखाद्याची छाती साधीसुधी नाही तर छप्पन्न इंचांची असायला हवी असते. कारण तेच पौरुषाचे प्रतीक; एखाद्याला बांगडय़ांचा आहेर पाठवायचा असतो. कारण ते ‘नामर्द’पणाचे प्रतीक; एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात तलवार परजायची असतेच शिवाय कुणा एखाद्याला वाढदिवसाचा केकदेखील तलवारीने कापायचा असतो. कारण ते शक्तीचे, ताकदीचे प्रतीक.. तलवार, गदा, त्रिशूळ या शक्तिप्रदर्शनाच्या साधनांच्या जोडीला ताकदीचे प्रतीक म्हणून आता बुलडोझरदेखील आला. सत्तेची, ताकदीची, शौर्याची, पौरुषाची प्रतीके आपल्याला सतत अशी सार्वजनिक ठिकाणी का मिरवायची आहेत? या सगळय़ाचा अर्थ काय?

तो हाच की फाइव्ह जीच्या वाटेवर असलेल्या, मंगळावर यान पाठवण्याची क्षमता असलेल्या, आधुनिक म्हणवणाऱ्या या काळात आपली मानसिकता मात्र मध्ययुगाच्या सरंजामी वातावरणातच घुटमळते आहे. आपण भले सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरू, विकसित पाश्चात्त्य जगाशी बरोबरी करण्याची भाषा करू, पण मनाने मात्र मध्ययुगीन, सरंजामी, पुरुषप्रधान वातावरणातच आहोत, याची चुणूक आपला समाज अशा पद्धतीने सतत देत असतो. समूहाने वावरताना अशा पद्धतीने शक्तिप्रदर्शन करणे ही मध्ययुगीन काळाची कदाचित गरज होती. निश्चित अशी राज्यव्यवस्था नसताना, वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षेची कोणतीही हमी नसताना समूहाने राहणे, सगळय़ा गोष्टी समूहाने करणे, ठरवणे हे कदाचित त्या काळात आवश्यक होते. ज्याच्याकडे शारीरिक ताकद जास्त, मनुष्यबळ जास्त, तो त्या काळात जगण्याच्या लढाईत टिकून राहू शकत होता. त्याला समूहाची मान्यता मिळत होती आणि समूहाचे नेतृत्वही. त्याच्या अंकित राहण्यातून जगणे सुलभ होत होते. दीनदुबळय़ांना टाचेखाली तुडवणारी, स्त्रियांना फक्त दुय्यम मानणारीच नव्हे तर वस्तू ठरवणारी जमीनदारी, सरंजामी व्यवस्था तत्कालीन परिस्थितीतूनच विकसित होत गेली. पौरुषाचे प्रतीक मानली गेलेली छप्पन्न इंची छाती आणि ती पेलणारी तलवार ही त्या काळाची गरज असेलही; पण त्या काळातून आणि त्या गरजेतून आपण आता पुढे आलो आहोत. आजच्या काळातली आपली  प्रतीके वेगळी असायला हवीत. कालसुसंगत असायला हवीत. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदा सुव्यवस्थेची हमी देणारी राज्यघटना आपण निर्माण केली आहे. ती राबवण्यासाठीची व्यवस्था आपण उभी केली आहे. या घटनेने प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची, संरक्षणाची हमी दिलेली आहे. असे असताना हातात तलवारी परजत लोक रस्त्यावरून जातात याचा अर्थ काय? त्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही? येथील कायदा सुव्यवस्थेवर विश्वाास नाही? आम्ही राज्यघटना, कायदा सुव्यवस्था जुमानत नाही, हेच तर त्यांना अशा शक्तिप्रदर्शनांमधून सांगायचे नसेल? असा अविश्वास हे राजकीय व्यवस्थेचे अपयश असेल, तर ते फक्त गतकाळातले की आजचेसुद्धा?

अर्थात मध्ययुगात महत्त्वाची असलेली ही प्रतीके फक्त आजच्याच काळात सतत सामोरी येत आहेत, असे नाही. ती गेली अनेक वर्षे सातत्याने आणि वेगवेगळय़ा पद्धतीने वापरली जाताना दिसतात. प्रतीकांच्या चढेलपणाची सवयच समाजाला लावून दिली जाते. आपल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चेचे कार्यक्रमदेखील साधेसुधे नसतात, तर ती कसली तरी ‘रणधुमाळी’ असते. मुंबई इंडियन्स हे नाव वगळता आपल्याकडच्या आयपीएलच्या संघांची नावेही ‘नाइट’ रायडर्स, सुपर‘किंग्ज’, ‘रॉयल’ चॅलेंजर्स अशी सरंजामी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी असतात. आजही कुणी तरी कुठल्या तरी मतदारसंघाचा अनभिषिक्त सम्राट असतो, कुणी कुठला युवराज असतो. कुणी तरी पंतप्रधान झाले तर आपण मुंडन करू असे जाहीर करून कुणाकडून तरी मध्ययुगीन पुरुषप्रधान संस्कृती पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जातो. ‘कन्यादाना’सारख्या प्रथेवर टीका झाली म्हणून कुणी तरी पेटून उठते. जातीबद्दल काही तरी बोलले गेले की कुणाच्या तरी भावना दुखावतात. समाज म्हणून आपण असेच, मध्ययुगीन प्रतिमा- प्रतीकांमध्ये अडकलेले आहोत, हेच खरे. 

अर्थात प्रतीके सगळीच वाईट असतात, असे नव्हे. आजकाल प्रत्येकाच्या हातात  मोबाइल फोन असतो. तो केवळ आधुनिकतेचे प्रतीक नाही, तर व्यक्तिस्वातंत्र्याचेही प्रतीक आहे. मग तसे व्यक्तिस्वातंत्र्य आपण मानतो का? मध्ययुगीन, सरंजामशाहीची प्रतीके महत्त्वाची मानणाऱ्यांना व्यक्तिस्वातंत्र्याशी काही देणेघेणे असणे संभवतच नाही. व्यक्तिस्वातंत्र्याला नकार देणारे स्त्रीस्वातंत्र्याला, जातीनिर्मूलनाला, धर्मस्वातंत्र्याला नकार देणार हे ओघानेच आले. एखाद्या पुरुषाला बायकी ठरवणे, तृतीयपंथीयांना तिरस्काराने वागवणे, सर्व प्रकारची दमनशाही हा सगळा या मानसिकतेचाच भाग आहे. हातात तलवारी किंवा त्रिशूळ घेऊन रस्त्यावरून फिरणाऱ्यांना आपण नेमके काय करतो आहोत ते समजणे शक्य नाही. पण आपण काय करतो आहोत, ते राजकारण्यांना मात्र नीट समजत उमगत असते. शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांच्या हातात रोजगाराचे साधन द्यायचे, त्यांच्या हातात खोटेनाटे सांगून तलवारी दिल्या की राजकारण्यांचे काम सोपे होते. कारण मग अशी भडकलेली माथी कोणतेही प्रश्न विचारत नाहीत की कोणतीही उत्तरे मागत नाहीत. पण आजच्या पिढीला अशा पद्धतीने मध्ययुगात नेणाऱ्या राजकारण्यांना का समजू नये की याच समाजात उद्यापरवा त्यांचीही नातवंडे- पतवंडे वाढणार, वावरणार आहेत? आज जे पेरले जाणार आहे तेच तर उद्या उगवणार आहे. ही सगळी मध्ययुगीन प्रतीके, ती मानसिकता पेरणाऱ्यांना नेमके कशाचे पीक हवे आहे, ते आपल्याला माहीत आहे. ते पीक येऊ द्यायचे का, याचा निर्णय आपण करायचा आहे.