समाजात लोकप्रियता अथवा वरिष्ठकृपेची पर्वा न करणारे जितके अधिक, तितका तो समाज प्रगत हे न्या. अभय ओक यांच्या मुद्द्यांतून उमगते…
‘सर्वोच्च सातत्य’ या (१४ मे) संपादकीयातून सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा ‘लोकसत्ता’ने यथोचित गौरव केला. त्यांच्या एकूण कारकीर्दीप्रमाणे निवृत्त होताना ‘‘पश्चात आपण कोणतेही पद स्वीकारणार नाही’’, हा त्यांनी जाहीरपणे दिलेला शब्द सद्या:स्थितीत अत्यंत आश्वासक. त्यांच्यापाठोपाठ न्या. अभय ओक निवृत्त झाले. दोन नि:स्पृह न्यायाधीशांचे सर्वोच्च न्यायालयातून असे एकापाठोपाठ निवृत्त होणे हे त्या न्यायालयाच्या आगामी वाटचालीसंदर्भात अधिक चौकसता निर्माण करणारे आहे. त्या संदर्भात भाष्य करण्याची संधी भविष्यात मिळेलच. तूर्त न्या. अभय ओक यांनी निवृत्तीसमयी व्यक्त केलेल्या विचारांविषयी. त्यातील दोन मुद्द्यांवर भाष्य समयोचित ठरावे. ते करण्याआधी न्या. ओक यांची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. कायदेविषयक कारकीर्दीची पार्श्वभूमी त्यांना घरातून मिळाली आणि त्यांनी ही परंपरा अधिक उज्ज्वल केली. त्यांचे वडील हे वकील होते आणि न्या. ओक यांची सुरुवातही या क्षेत्रात झाली. पुढे ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदही त्यांनी भूषवले. मुंबई उच्च न्यायालयात असताना आणि त्या शहरात निवासाचा अधिकार असतानाही न्या. ओक स्वत:च्या मोटारीने दररोज ठाणे ते मुंबई असा प्रवास करत. हातातील काम संपवण्यासाठी वेळेच्या सरकारी चौकटीची तमा त्यांनी कधी बाळगली नाही. नियम पाळणे या किमान गुणास ‘विशेष’ गुणाचा दर्जा दिला जाण्याच्या आजच्या काळात न्या. ओक यांचे सर्वसामान्य नागरिकासारखे जगणे हे अप्रूपाचे आणि अनुकरणीय. आता त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांविषयी.
सर्वोच्च न्यायालय हे ‘सरन्यायाधीशकेंद्री’ झाले आहे हा त्यातील एक. कोणत्या न्यायाधीशासमोर कोणत्या प्रकरणाची सुनावणी व्हावी याची कार्यक्रमपत्रिका (रोस्टर) ठरवण्याखेरीज सरन्यायाधीश या पदास अन्य कोणताही विशेषाधिकार नाही; हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. सरन्यायाधीश सर्व समानाधिकारांतील प्रथम क्रमांकाचे (फर्स्ट अमंग्स्ट ईक्वल्स) इतकेच असतात. तथापि वास्तवात सरन्यायाधीश हा जणू समस्त न्यायाधीशगणाचा नायक असे मानले जाते आणि त्याप्रमाणे त्यास वागणूक दिली जाते. उच्च न्यायालयांत असे नाही, असे न्या. ओक दाखवून देतात. उच्च न्यायालयांत ज्येष्ठ न्यायाधीशांची एक समिती असते आणि ती सहमतीने सर्व प्रशासकीय निर्णय घेते. देशातील अशा विविध उच्च न्यायालयांतून वेचक ३४ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयापर्यंत येतात आणि त्यांच्यातील एक सेवाज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीश होतो. अशा वेळी सरन्यायाधीशास इतरांपेक्षा काही वेगळे अधिकार आहेत, तो कोणी अन्यापेक्षा अधिक योग्य आहे असे चित्र सद्या:स्थितीत निर्माण होते. ते बदलून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे अधिकाधिक विकेंद्रीकरण व्हायला हवे अशी गरज न्या. ओक व्यक्त करतात. ती अत्यंत योग्य. तथापि या मुद्द्याकडे केवळ प्रशासकीय नजरेतून पाहणे अपूर्ण ठरेल. हा विषय जितका प्रशासकीय आहे तितकाच तो सांस्कृतिकदेखील आहे.
म्हणजे असे की कोणा एकाकडे नायकत्व द्यावयाचे आणि इतरांनी हातावर हात ठेवून या नायकाच्या ठायी असलेल्या/ नसलेल्या नेतृत्वगुणांखाली दडून आपापला कार्यभाग साधत राहावयाचा हे आपले सामाजिक इंगित. राजकारण असो समाजकारण असो वा खेळ वा अन्य काही. ‘कोणीतरी एक’ येऊन आपला उद्धार करेल हीच आपली मानसिकता. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यप्रणालीतही ती दिसून येत असेल तर ते नैसर्गिक म्हणायला हवे. चांगले झाल्यास श्रेयातील वाटा घ्यावयाचा आणि वाईटाची जबाबदारी नायकाच्या माथी मारायची हा प्रकार सर्रास यातूनच दिसून येतो. याचा खरा दुष्परिणाम होतो तो जबाबदारी घेण्याची क्षमता आणि कर्तृत्व असलेले तसेच निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवण्यास तयार असलेले, यांच्यावर. न्या. ओक हे अशांतील असल्याने त्यांनी हे सत्य बोलून दाखवले. आणि तेही सरन्यायाधीश न्या. भूषण गवई हे प्रत्यक्ष हजर असताना. ही बाब विशेष. एरवी ज्येष्ठाच्या अनुपस्थितीत त्याच्या/ तिच्या वैगुण्याची खासगी चर्चा करणाऱ्यांची कमतरता या देशात कधीच नव्हती आणि नाहीही. न्या. ओक यांनी हा मार्ग पत्करला नाही.
म्हणून त्यांनी मांडलेल्या दुसऱ्या मुद्द्याचे महत्त्व. ‘‘कोणास काय वाटेल याची पर्वा न्यायाधीशाने करू नये’’, हा तो दुसरा मुद्दा. तो खरे तर केवळ न्यायाधीशांनाच नव्हे तर सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येकास लागू होतो. आपणास आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत शुद्ध प्रामाणिकपणाने आपणावर सोपवलेले काम दररोज करत राहणे म्हणजे खरी कर्तव्यपूर्ती हे चिरंतन सत्य आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे न्यायाधीश असो वा नोकरशहा वा संपादक वा अन्य कोणी. ही मंडळी कोणास काय वाटेल याचा विचार करून आपले निर्णय बेतू लागतात आणि ज्यांस आपल्या निर्णयाने बरे वाटले त्यांच्याकडून आपल्या निर्णयांचे मोल दामदुप्पट वसूल करतात. म्हणूनच सरन्यायाधीशपद भोगलेली व्यक्ती दोनशे जणांतील एक खासदार होण्यात वा वीतभर राजभवनाची निवासी होण्यात धन्यता मानते आणि त्याचमुळे मुख्य निवडणूक आयुक्त या सर्वोच्च घटनात्मक पदावरून निवृत्त झालेले एखाद्या भुक्कड खात्याचे मंत्री होण्यात आनंद मानतात. काही किडुकमिडुक उद्याोग करणाऱ्यांकडून असे झाले तर ते एकवेळ समजून घेता येईल. परंतु न्यायदानाच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यातील व्यक्ती कोणास काय वाटेल असा विचार करून निर्णय करू लागली तर सामाजिक हाहाकार माजणे फार दूर नाही. आसपास लाचार आणि लांगूलचालक उच्चपदस्थांची पैदास किती झपाट्याने होऊ लागलेली आहे हे दिसत असताना न्या. ओक यांचे शब्द आश्वासक ठरतात. या त्यांच्या विधानास दोन अंगे आहेत.
एक आहे वैचारिक आणि दुसरे विचारशून्य सोय; हे. यापैकी पहिल्या गटात वैचारिक वेठबिगारांचा अंतर्भाव होतो. या वैचारिक वेठबिगारीत अडकलेले आपल्या ‘मालकाचे’ वैगुण्य पाहू/ समजू आणि त्यामुळे अर्थात उमजूही शकत नाहीत. टांग्याच्या घोड्याने जसे जास्त पाहू नये अशी सोय टांगेवाला करतो त्याप्रमाणे तशी मर्यादित दृष्टी आणि मर्यादित आकलनक्षमता या वैचारिक वेठबिगारांची राहील अशीच व्यवस्था असते. ही आकलनक्षमता जितकी कमी तितकी भौतिक प्रगतीची संधी अधिक. अलीकडे या प्रगतीच्या मोहापोटी स्वत:हून अशा वेठबिगारांत सामील होऊ पाहणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. हे सर्व ‘विचारशून्य सोय’ या दुसऱ्या गटातील. या गटातील सोयीस्करांस वैचारिकतेशी काहीही देणेघेणे नसते. ऐहिक प्रगती इतकेच त्यांचे ध्येय. ते साधण्यासाठी या गटातील अनेक पहिल्या, म्हणजे वैचारिक वेठबिगार, गटातील अनेकांपेक्षा अधिक मोठी बांग देतात. गट कोणताही असो. दोन्हींतील व्यक्तींचे उद्दिष्ट एकच. प्रचलित सत्ताधीशांसमोर आपली लोकप्रियता वा अनुकूलता सिद्ध करणे. तसे करताना सत्ताधीशांचे लक्ष एकदा का वेधले गेले की बरेच काही पदरात पाडून घेता येते. न्यायाधीशांनी लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करू नये वा ते त्यांचे ध्येय असू नये असे जेव्हा न्या. अभय ओक निर्भयपणे म्हणतात तेव्हा त्याच्यामागे इतका अर्थ आहे आणि त्यास सध्याची परिस्थिती ही पार्श्वभूमी आहे.
एखाद्या समाजात या लोकप्रियतेची पर्वा न करणारे जितके अधिक; तितकी त्या समाजाची प्रगती अधिक असे हे साधे समीकरण. त्यासाठी विंदा म्हणतात त्याप्रमाणे
सत्यास साक्षी ठेऊनी वागेल जो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे!
न्या. ओक अशी तयारी दाखवून हा अप्रियतेतील आनंद अधोरेखित करतात. त्याचे स्वागत.