मुरबाडसारख्या तालुक्यात येथील युवकांसाठी कौशल्य विकासाच्या संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करणे आवश्यक आहेत. येथील इतर मागास विद्यार्थ्यांसाठी आयटीआय उभारण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी दिले. आमदार किसान कथोरे पाठपुरावा करीत असलेल्या मुरबाड येथील क्रीडा संकुलामुळे खेळाडूंसाठी एक चांगली सुविधा निर्माण होणार असून आगामी अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेतला जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही तावडे म्हणाले.
मुरबाड नजीकच्या देवपे येथील शांती सेवा निधी आणि एन.टी.टी.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंत्रशिक्षणातील सुधारणा या परिसंवादात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी येथील इतर मागास विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाविषयी आपले विचार मांडले. एन.टी.टी.एफ.ने उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाची रचना केली असून युवकांतील कौशल्य विकासाचे काम हाती घेतले आहे. हरियाणा, ओरिसा, कर्नाटक तसेच इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना भविष्य घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे, हे प्रशंसनीय आहे. केवळ पदवी असून चालत नाही तर कौशल्य बाळगणे खूप गरजेचे आहे, असे तावडे म्हणाले. आजच्या पदवीधरांनी कुठले न कुठले कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. मुरबाडमधील शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीवर आधारित जोडधंदे करून आर्थिक स्वावलंबन मिळवावे व आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शासन नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहील, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार किसान कथोरे यांनीही आपले विचार मांडले. व्यासपीठावर आमदार नरेंद्र पवार तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.