News Flash

करोना कराल : महामुंबईची करोना‘वाट’

म्हणता म्हणता एक-दोन आकडी रुग्णसंख्येने चार आकडय़ांची ‘हजारी’ मजल गाठली. त्या आलेखातून महामुंबईची ‘वाट’ दाखवण्याचा हा प्रयत्न.

डिसेंबर २०१९पासूनच चीन, युरोप, अमेरिकेत हाहाकार उडवणाऱ्या करोना विषाणूची मार्चपर्यंत भारतात चर्चाही नव्हती.

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : डिसेंबर २०१९पासूनच चीन, युरोप, अमेरिकेत हाहाकार उडवणाऱ्या करोना विषाणूची मार्चपर्यंत भारतात चर्चाही नव्हती. पण ९ मार्च २०२० रोजी दुबईसहलीवरून पुण्यात परतलेल्या कुटुंबामध्ये करोना विषाणू आढळला आणि त्यानंतर दोनच दिवसांत मुंबईतही त्याचा पहिला बाधित सापडून आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपाठोपाठ तिला लागून विस्तारत चाललेल्या महामुंबई क्षेत्रालाही करोनाची बाधा सतावू लागली. म्हणता म्हणता एक-दोन आकडी रुग्णसंख्येने चार आकडय़ांची ‘हजारी’ मजल गाठली. त्या आलेखातून महामुंबईची ‘वाट’ दाखवण्याचा हा प्रयत्न.

एका महिन्यात आठपटीने वाढ

मुंबईत पहिला रुग्ण आढळला आणि दोनाचे चार, चाराचे आठ असे करत २२ मार्चला टाळेबंदी लागू केली तेव्हा राज्यात ५० रुग्ण होते, तर मुंबईत रुग्णांची संख्या ३६ होती आणि दोन मृत्यूंची नोंद होती. परंतु नऊच दिवसांत मुंबईला विषाणूने विळखा घालायला सुरुवात केली आणि रुग्णसंख्येने १७० चा आकडा पार केला, तर मृतांची संख्या आठवर पोहचली. मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्’ाांतही विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केले. सुरुवातीलाच या संसर्गाने झोपडपट्टय़ा आणि दाटीवाटीच्या वस्त्यांना विळख्यात घेतले. परिणामी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात एक हजार असलेली रुग्णसंख्या अवघ्या महिन्याभरात आठपटीने वाढून ८३०० वर गेली. मृतांची संख्याही जवळपास चौपटीने वाढून ३०० पर्यंत पोहोचली. एप्रिलच्या सुरुवातीला ६ टक्के मृत्युदर नोंदवला गेला. ठाणे जिल्’ाातही मार्चमधील २९ ही करोनाबाधितांची संख्या महिनाभरात नऊशेपार आणि मेपर्यंत सात हजारांपलीकडे गेली. पालघर, वसई-विरार पट्टय़ातही आकडेवारीची उसळी अशीच होती.

खाटांची कमतरता, मृत्यूंचे भर

कडक टाळेबंदी लागू असतानाही संपूर्ण महामुंबईत मे महिन्यात करोनासंसर्ग फोफावत गेला. मुंबईतील रुग्णसंख्येत महिनाभरात पाच पटीने वाढ होऊन ती ४७ हजारांवर गेली. सर्वच शहरांत दैनंदिन रुग्णसंख्या रोज नवीन उच्चांक गाठू लागली. या बाधितांत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. परिणामी आरोग्यव्यवस्था कोलमडू लागली. पालिका, सरकारी रुग्णालये रुग्णांनी ओसांडून वाहत होती. अतिदक्षता विभागाच्या खाटांसाठी रुग्णांची वणवण सुरू होती. मोठी करोना रुग्णालये उभारली असली तरी ती कार्यरत होण्यासाठी मनुष्यबळ अपुरे असल्याने केरळकडे डॉक्टर आणि परिचारिकांची मागणी करण्याची वेळ मुंबईवर आली. परिणामी जूनमध्ये पुन्हा मृत्यूचा आलेख सहा टक्क्य़ांपर्यंत गेला. सरकारी आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागल्याने आधी मुंबई महापालिकेने आणि पाठोपाठ अन्य महापालिकांनीही खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.

चाचण्या वाढवण्यासाठी प्रयत्न

करोनावर प्रतिबंधक उपाय नसल्याने चाचण्या वाढवून जास्तीतजास्त रुग्ण शोधणे व त्यांचे विलगीकरण व उपचार करणे, हाच एक मार्ग समोर होता. त्याअनुषंगाने चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी जूनपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. आरटीपीसीआर चाचण्या महागडय़ा, वेळखाऊ असल्याने क्ष-किरण चाचण्या सुरू झाल्या. परिणामी जुलैमध्ये विषाणूचा प्रसार काही अंशी कमी झाला. परंतु उपचारांच्या नियमावलीचे योग्य रीतीने पालन न होणे, औषधांचा साठा पुरेसा नसणे आणि अतिदक्षता विभागातील खाटा, ऑक्सिजनची कमतरता या अडचणी सुरूच असल्याने सहा टक्क्य़ांपर्यंत असलेला मृत्युदर ऑगस्टमध्ये कायम होता. अपुऱ्या चाचण्यांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रतिजन चाचण्यांचा वापर सुरू झाला. त्यामुळेही रुग्णांचे निदान होण्यात मोठी मदत झाली. त्यामुळे ऑगस्टमध्ये संसर्गाचा प्रसार मंदावला. जून, जुलैच्या तुलनेत सर्वच शहरांतील ऑगस्टमधील रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याने करोनाची लाट ओसरू लागल्याची आशा जनमानसांत निर्माण झाली.

गणेशोत्सवानंतर पुन्हा रुग्णवाढ

याच दिलाशाने बेफिकिरीलाही बळ दिले. संसर्गाचा प्रसार कमी होत असल्याच्या आशादायक चित्राचा गणेशोत्सवातील गर्दीने बेरंग केला. प्रवासासाठी गर्दी, ओसांडून वाहणाऱ्या बाजारपेठा यामुळे सप्टेंबरमध्ये तर दर आठवडय़ाला नव्याने निदान होणाऱ्या रुग्णसंख्येने १५ हजारांचा टप्पा गाठला. पुन्हा ‘जैसै थे’ परिस्थिती निर्माण झाली. मात्र, रुग्णांचे तातडीने निदान, विलगीकरण आणि खासगी आणि मोठय़ा करोना रुग्णालयात उपलब्ध खाटा, वेळेत उपचार यामुळे मृत्युदरात वाढ झाली नाही. उलट मृत्युदर सहावरून साडेचार टक्क्य़ांपर्यंत खाली आला.

सप्टेंबरमधील संकट

प्रशासकीय उपाययोजनांमुळे वाढत्या रुग्णसंख्येला उपचारसुविधा पुरवण्यासाठी यंत्रणा सक्षम होत होत्या. मात्र, गणेशोत्सवानंतर सुरू झालेली करोनाची उसळी दिवसेंदिवस वर चढत होती. सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्यात होती. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांत एकूण दररोज पाच हजारांवर रुग्ण आढळून येत होते. विशेषत: सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा (२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर) दरदिवशीच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता.

दिवाळीपूर्वी दिलासा

सप्टेंबरमध्ये उच्चांकावर पोहोचलेल्या करोना रुग्णसंख्येने पुन्हा टाळेबंदीचे सावट निर्माण केले. त्यामुळे येणारा दिवाळसण यंदा अंधारात जाणार, अशी चिन्हे दिसत असताना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून परिस्थिती नियंत्रणात यायला सुरुवात झाली. अर्थात त्यामुळे दिवाळीत बाजारपेठांत झुंबड उडू लागली, नातेवाईकांकडे भेटीगाठीही सुरू झाल्या. यातून परिस्थिती पुन्हा हाताबाहेर अशी भीती होती. परंतु, संसर्ग लगेच आटोक्यात आला. परिणामी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील करोनाबाधितांची संख्या जवळपास निम्म्यावर घसरली. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालीच; पण मृत्युदरही झपाटय़ाने खाली आला. डिसेंबरमध्ये नववर्ष स्वागताच्या उत्साहामुळे करोनाचे संकट पुन्हा गडद होण्याची भीतीही खोटी ठरली आणि ‘करोना निवळला’ या भावनेने साऱ्यांनाच निश्चिंत केले.

फेब्रुवारीपासून पुन्हा संसर्गाचा प्रसार

सरत्या वर्षांबरोबरच संसर्गाचा प्रभाव कमी झाल्याने हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात जवळपास ३ हजार रुग्णांचे नव्याने निदान झाले. फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवडय़ापासून नव्याने निदान होणाऱ्या रुग्णसंख्येने चार ते सहा हजारांचा टप्पा गाठला आहे. दरदिवशीची रुग्णसंख्या हजारापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पुन्हा सावध पवित्रा घेत पालिका जागृत झाली असली तरी नागरिकांमध्ये मात्र ही जागरूकता आलेली नाही. ठाणे जिल्ह्य़ात दोन ते तीन महिन्यांपासून दररोज सरासरी साडेतीनशे ते साडेचारशे रुग्ण आढळून येत होते. तर, आता पाचशेपेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून येत आहेत.

मृत्युदरावर नियंत्रण

मुंबईतील दर आठवडय़ाची रुग्णसंख्या पुन्हा सहा हजारांच्या घरात पोहोचली असली तरी मृतांची संख्या केवळ ३० आहे. रुग्णसंख्येतील वाढ कायम असली तरी मृतांच्या संख्या अजूनही नियंत्रणात आहे आणि सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आता मृतांमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांचा समावेश असून बहुतांश रुग्ण वेळेत दाखल होत असल्याने उपचार वेळेत होत आहेत. लसीकरण मोहिमेनेही परिस्थितीला बळ दिले आहे.

ठाणे, कल्याण शहरे करोना केंद्रे

गेल्यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर जिल्ह्य़ातील सर्वच शहरांमध्ये करोना रुग्णसंख्या वाढू लागली. या रुग्णसंख्येत ठाणे आणि कल्याण -डोंबिवली शहरात सर्वाधिक रुग्ण होते. इतर शहरांमध्ये त्या खालोखाल रुग्ण होते. तर, भिवंडी शहरात मात्र सुरुवातीपासूनच करोना रुग्णसंख्या सर्वात कमी असल्याचे चित्र होते आणि आजही हे चित्र कायम आहे.

एपीएमसी बाजाराची चिंता

नवी मुंबई शहरातील झोपडपट्टीबहुल भागात करोनाचा प्रसार वाढत असतानाच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गर्दी आणि बेफिकिरीने प्रशासनाची चिंता वाढवली. एपीएमसी आवारातील पाचही बाजार खुले झाल्यानंतर तेथे विक्रेते, व्यापारी, शेतकरी आणि माथाडी कामगार वर्ग यांची वर्दळ वाढू लागली. यातूनच बाजार समिती हे करोनाचे केंद्र बनले. ही परिस्थिती इतकी भीषण बनली की, बाजार समितीच्या आवारात विशेष चाचणी केंद्रे उभारण्यात आली. यातून अनेक करोनाबाधितांचा शोध लागला. बाजार समितीच्या आवारातील गर्दी कमी करण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न करूनही त्यात प्रशासनाला यश आले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 2:11 am

Web Title: corona timeline dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रातच निर्बंध
2 नियम न पाळल्यास कठोर र्निबध
3 परगावातून आलेले प्रवासी करोना चाचणीविना थेट शहरात
Just Now!
X