|| भगवान मंडलिक

कामगिरीत सातत्य नसल्यामुळे बदली झाल्याची चर्चा

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहराला सुस्थितीत आणण्यासाठी ठोस निर्णय घ्या असे वारंवार आदेश देऊनही कामगिरीचा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेले कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त गोंविद बोडके यांना पालकमंत्री एकनाथ िशदे यांची नाराजी भोवल्याची चर्चा येथील महापालिका वर्तुळात आहे.

शहरातील फेरीवाले, बेकायदा बांधकामे रोखण्यातही प्रशासनाला पुरेसे यश मिळत नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपविरोधात विरोधकांनी आक्रमक प्रचार केला होता. पुढील सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत अशीच कामगिरी राहिली तर त्याचा फटका सत्ताधारी म्हणून आपल्याला बसू शकतो याची जाणीव झाल्यानेच पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन बोडके यांना बदलल्याची चर्चा आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत विकासकामे ठप्प आहेत. शहरात सध्या पाच हजांराहून अधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. पालिकेचे आरक्षित २०० हून अधिक भूखंड माफियांनी हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आघाडीवर बोडके यांचे प्रशासन ठोस काही करत नसल्याच्या तक्रारी होत्या. ठाणे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील आठवडय़ात दौऱ्यावर आले. त्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील शिवसेनेच्या एका मंत्र्याने कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त बोडके यांचा प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. सत्ताधारी शिवसेनेतील काही मान्यवर मंडळी त्यांच्या उद्योगात सामील असल्याची माहिती दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले. पालिकेला न कळविता आपण अचानक त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतो, असे मुख्यमंत्र्यांनी सहकारी मंत्र्याला सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचा आढावा घेतला, त्यावेळी एकही आदर्शवत असे काम पालिका हद्दीत वर्षभरात उभे राहिले नाही हे स्पष्ट झाले. मागील अनेक वर्षांपासूनचा आधारवाडी कचरामैदान प्रशासन उंबर्डे येथे स्थलांतरित करू शकले नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यातून शहर स्वच्छ दिसण्याऐवजी जागोजागी कचऱ्याचे ढीग, स्वच्छ अभियानाच्या रंगविलेल्या भिंती मुख्यमंत्र्यांना दिसल्या.

स्मार्ट सिटीची कामे रखडली

शहरासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत गेल्या सरकारने जाहीर केलेल्या अनेक योजना लालफितीत अडकल्या आहेत. बाह्यवळण रस्ता अद्याप भूसंपादनाच्या कचाटय़ात अडकला आहे. २७ गावची अमृत पाणी योजना रखडली आहे. शहरातील वाहन कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. उपायुक्त सुनील जोशी यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे पदे देणे, बडतर्फ श्रीधर थल्ला यांना आठ वर्षांनंतर सेवेत घेणे असे प्रकार सुरूच आहेत. उत्पन्न वाढावे अशी कोणतीही ठोस योजना महापालिकेत राबवली जात नव्हती. कल्याण डोंबिवली, टिटवाळा परिसरातील बांधकाम उद्योगावर मंदीची अवकळा आली आहे. येथील बिल्डरांना मदतीचा हात पुढे करून विकास शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी असा मुद्दा पुढे आला होता. मात्र, महापालिकेकडे पैसे नाहीत असे कारण पुढे करत प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास नन्नाचा पाढा सुरू ठेवला होता. त्यामुळेही पालकमंत्री शिंदे नाराज होते. या नाराजीचा एकत्रित फटका बोडके यांना बसल्याची चर्चा आहे. महापालिकेचे नवे आयुक्त सूर्यवंशी हे शिंदे यांच्या मर्जीतील मानले जातात. ‘काम’ करण्याच्या सूचना घेऊनच ते महापालिकेत रुजू झाल्याचे बोलले जाते.

ऐकू आनंदे  : सहृदय एक कलांगण आणि आदर्श विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऐकू आनंदे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात अपोलो ११ मोहीम, इस्त्रोची ५० वर्षे, चंद्रयान २ मोहीम आणि कंकणाकृती सूर्यग्रहण या खगोलविज्ञान विषयावर मुकुंद मराठे उपस्थितांशी संवाद साधाणार आहेत. हे व्याख्यान रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आदर्श विद्यालय सभागृह, बदलापूर (पू.) येथे होणार आहे.