30 October 2020

News Flash

महापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा

सद्यस्थितीत पुरेशी सेवा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

सद्यस्थितीत पुरेशी सेवा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून परिवहन प्रशासनाने वाशी, कोकण भवन, पनवेल मार्गावर बसेस सोडण्याचे नवे नियोजन आखले आहे. मात्र, करोनाच्या काळात सद्यस्थितीत महापालिकेची परिवहनची पुरेशी सेवा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

नवी मुंबई, पनवेल परिसरातील कंपन्या, सरकारी, खासगी आस्थापनांमध्ये डोंबिवली, कल्याण परिसरातील नोकरदार नियमित बसने प्रवास करतात.  टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यापासून राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या शहरा अंतर्गत तसेच बाहेर सेवा देणाऱ्या बसेसच्या फे ऱ्या सुरू झाल्या आहेत. केडीएमटीच्या बसेस मात्र पुरेशा प्रमाणात सुरू झाल्या नसल्यामुळे त्याचा फटका शहरातील नोकरदारांना बसू लागला आहे. खासगी आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना सध्या अत्यावश्यक सेवा लोकलमधून प्रवासाला मुभा नाही. त्यामुळे डोंबिवली, कल्याणमधील बहुतांशी प्रवासी सुरुवातीला उबर, ओला वाहनांनी, खासगी चारचाकी वाहने करून कामाच्या ठिकाणी जातात.  हा प्रवास खर्चिक तसेच कोंडीचा ठरत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहनचा भार  ‘एनएमएनटी’च्या बसेसवर आहे.   ‘एनएमएनटी’च्या कल्याण, डोंबिवलीत दिवसभरात १० फेऱ्या असतात. मात्र, शिळफाटा वाहतूक कोंडीमुळे या फेऱ्या चार ते पाच होतात.  दरम्यान, उशिरा का होईना, केडीएमटी प्रशासनाने नवी मुंबई आणि मलंगगड परिसरात बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.  लवकरच वाशी, कोकण भवन, पनवेलच्या दिशेने बसेस सुरू केल्या जातील, अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली.

आठ कोटींचे नुकसान

परिवहन विभागाला दर दिवसाला  चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होते.  मार्चमध्ये करोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदीचा काळात मार्च ते ऑगस्टपर्यंत  सुमारे आठ कोटीं रुपयांचे नुकसान झाले. सध्या प्रवासी वाहतुकीतून दर दिवसाला पाच ते १० हजार रुपये उत्पन्न मिळते. पालिका प्रशासनाकडून आर्थिक साहाय्य होते म्हणून गाडा सुरू आहे, असे परिवहनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

५० कर्मचारी आरोग्य सेवेत

पालिका परिवहन उपक्रमाचे ३० चालक आणि २० वाहक करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना  सेवा देत आहेत.  ४० बस सध्या कल्याण, डोंबिवली शहरांतर्गत तसेच बदलापूर, वांगणी,  टिटवाळा, मोहने,  आसनगाव भागात सेवा देत आहेत. ५० बस उपलब्ध आहेत. काही बस किरकोळ दुरुस्तीसाठी उभ्या आहेत.  कठोर टाळेबंदीच्या काळात करोना सेवेतील कर्मचाऱ्यांना नि:शुल्क सेवा दिली. सध्या  कर्मचाऱ्यांकडून तिकीट आकारले जाते. फक्त पालिकेच्या परिचारिका, सफाई कामगार यांना मोफत प्रवास दिला जातो, असे  अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मलंगगड, भिवंडी, नवी मुंबईकडे जाणाऱ्या बस सेवांचे नियोजन केले जात आहे. लवकरच या सेवा सुरू केल्या जातील.

-संदीप भोसले, आगार व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:39 am

Web Title: kdmt bus service soon on vashi konkan bhavan route zws 70
Next Stories
1 करोना चाचणीला नागरिकांचा विरोध
2 पाणपोईभोवती कचऱ्याचे डबे
3 परिवहन ठेका रद्द न झाल्याने बसगाडय़ा जागीच
Just Now!
X