भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरातील प्रमोद महाजन सभागृहात  निर्माण करण्यात आलेल्या कोविड केंद्रात  उद्घाटनाच्या अवघ्या दुसऱ्याची दिवशी गळती सुरू झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने अद्यापही रुग्णांना तिथे हलवण्यात न आल्यामुळे नागरिकांकडून  समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमोद महाजन सभागृहात राज्य शासन आणि म्हाडाच्या सहयोगाने ३६६ खाटा असलेले ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्रा’चे सोमवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण  करण्यात आले होते.परंतु उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी सुरू झालेल्या पावसामुळे केंद्रात  सर्वत्र गळती सुरू झाली आहे. केंद्रात सर्वत्र साचत असलेल्या पाण्याला बाहेर काढता काढता सफाई कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे आढळून आले.

मीरा भाईंदरमधील वाढत्या रुग्ण संख्येला लक्षात घेता राज्य शासन आणि महाडाच्या संयोगाने ३६६ खाटांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.

साधारण मे महिन्याच्या अखेरीस सुरू झालेले हे काम जुलैअखेरीस पूर्ण झाले. काम सुरू असतानादेखील पाउसाची हजेरी होती. परंतु त्यावर दुर्लक्षपणा करत काम केल्यामुळे या केंद्राला गळती लागली असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

केंद्राच्या गळतीचे काम पूर्ण केल्यानंतर रुग्णांना त्या केंद्रात हलवण्यात येईल.

– संभाजी वाघमारे, उपायुक्त, वैद्यकीय विभाग

अत्यंत गंभीर विषयातदेखील करण्यात आलेल्या या निष्काळजीपणामुळे संबंधित अधिकाऱ्यावर  आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

– रोहित सुवण, सामाजिक कार्यकर्ते