कीर्ती केसरकर

विरारमध्ये आता केवळ एकच क्रीडांगण; अनेक मैदानांमध्ये अतिक्रमण

विरार शहरातील मैदाने आता इतिहासजमा होऊ लागली असून शहरातील मुले मैदानी खेळांपासून पारखी होऊ लागली आहेत. विरार पश्चिमेला विराटनगर येथील केवळ एकच मैदान आता शिल्लक असून अन्या मैदाने विकासकांनी घशात घातली आहे. विविध मैदानांवर आता इमारती उभ्या राहिल्या असून महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप क्रीडाप्रेमींनी केला आहे.

मैदाने शहराची फुप्फुसे मानली जातात. मैदानी खेळ आरोग्यासाठी आणि मनोरंजनासाठी आवश्यक असतात. मात्र वाढत्या शहरीकरणाचा फटका मैदानांना बसत आहेत. विरारमधील अनेक मैदाने बांधकाम व्यावसायिकांनी गिळंकृत केली आहेत. अनेक इमारतींवर इमारती आणि अन्य बांधकामे केली गेली आहेत.

पालिकेने शहरातील तलावांचे सुशोभिकरण केले आहे. मात्र  मैदानांच्या आरक्षित जागा विकसित केलेल्या नाहीत, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे मैदाने इतिहासजमा होऊ  लागली आहेत. अनेक मैदाने ही खासगी मालकीची होती. परंतु तिथे मुलांना खेळण्यास बंदी नव्हती. मालकांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी जागा विकल्या आणि तिथे इमारती उभ्या राहू लागल्या, असे रहिवाशांनी सांगितले.

मैदाने गिळंकृत

* विरार पश्चिमेला जकात नाका येथे मधुरम हॉटेलच्या मागे मोठे मैदान आहे. त्या जागेवर आता बाजार भरतो. एरवी ती जागा सर्कस किंवा विविध प्रदर्शनासाठी दिली जाते. ते मैदान सतत व्यग्र असते. त्यामुळे मुलांना तिथे खेळता येत नाही.

*  एमजीएम शाळेच्या बाजूला असलेल्या मोठय़ा मैदानात पूर्वी मुले खेळत होती. आता ती जागा म्हाडाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. तिथे इमारती उभ्या राहू लागल्या आहेत.

*  संयोग रुग्णालयासोर पूर्वी बाबा मैदान होते. तिथेही इमारतीचे बांधकाम होऊ लागले आहे.

*  इस्टेट इथे छोटे मैदान आहे, तर विराटनगर येथे एकमेव प्रशस्त मैदान आहे. या मैदानावर मोठी गर्दी असते. शहरातील शिल्लक राहिलेले एकमेव मैदान आहे.

विरार पश्चिमेला विराटनगर येथे प्रशस्त मैदान आहे. तिथे मुले नियमित खेळत असतात आणि विविध क्रीडा स्पर्धा होत असतात. म्हाडा मैदानात आम्ही अद्ययावत क्रीडा संकुल उभारत आहोत. तिथे मुलांना मैदानी खेळांबरोबर विविध स्पर्धात्मक खेळ खेळता येणार आहे. आंततराष्ट्रीय मानांकनानुसार हे मैदान तयार होत आहे.

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका

जनक्षोभानंतर मैदानावरील कचराकुंडी हटवली

शहरात खेळाची मैदाने कमी असताना अस्तित्वातील मैदानात मोठी कचराकुंडी उभारण्याचा प्रताप वसई-विरार महापालिकेने केला. नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे अखेर ही कचराकुंडी हटवण्यात आली आहे.

वसईतील चुळणे गावातील एकमेव मैदानात महापालिकेच्या वतीने काँक्रीटची कचराकुंडी ठेवण्यात आली. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांना आणि त्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय व्हायची. याबाबत महापालिकेकडे जागृती सेवा संस्थेच्या वतीने तक्रार केली होती. या ठिकाणी असलेली काँक्रीटची कचराकुंडी तोडून मैदानाच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.

चुळणे गावातील हे एकमेव मैदान असल्याने या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे नागरिकांना या कचराकुंडीमुळे दरुगधी, घाणीचा वास सहन करावा लागत होता. ऑगस्ट महिन्यात पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून कचराकुंडी हटवण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र कचराकुंडी हटवली गेली नव्हती. उलट सतत साठणाऱ्या कचऱ्यामुळे ही समस्या उग्र बनत चालली होती. परिसरातील नागरिकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन ही कचराकुंडी हटवण्याची मागणी केली. त्यानंतर पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर कचराकुंडी हटवण्यात आली होती.

खेळाच्या मैदानात कचराकुंडी कशी काय ठेवली जाऊ शकते. ते ठेवणाऱ्यांची मानसिकता यावरून दिसून येते. आम्हाला कचराकुंडी हटवण्यासाठी पाठपुरावा करावा लागणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता ही कचराकुंडी हटवण्यात आली असून भविष्यात पालिका अधिकारी असे प्रकार करणार नाहीत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.