कल्याण – कल्याण पश्चिमेतील एका ५० वर्ष वयाच्या सराफाची ९५० ग्रॅम सोन्याचे दागिने विक्रीच्या माध्यमातून कळवा येथील एका ४० वर्षाच्या सराफाने ९३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत हा सोने खरेदी, विक्री आणि फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी कल्याणच्या सराफाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
फसवणूक झालेला सराफ कल्याण पश्चिमेतील लेले आळीतील मानव मंंदिर परिसरात राहतो. सोने खरेदी करून फसवणूक करणारा सराफ ठाणे पश्चिमेतील कळवा येथील कळवा रेल्वे स्थानक रस्ता परिसरात राहतो. कल्याण मधील सराफाचे कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ सराफा बाजारात सोने, चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे.
कळवा येथील सराफाचे शहापूर तालुक्यातील खर्डी येथे सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. दोन्ही सराफ एकमेकांंना परिचित होते. कळवा येथील सराफ कल्याणमधील सराफाकडून आपल्या दुकानात सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी खरेदी करत होता. त्यामुळे अनेक वेळा पैसे नसताना कल्याणच्या सराफाने खर्डीच्या सराफाला (कळवा निवासी) सोन्याचे दागिने उधारीने दिले आहेत.
फसवणूक झालेल्या कल्याणमधील सराफाने बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की कळवा येथे राहणाऱ्या एका सराफाचे शहापूर तालुक्यातील खर्डी येथे (मध्य रेल्वे मार्गावरील आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यानचे रेल्वे स्थानक) सोने, चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. खर्डीच्या सराफाने आपला विश्वास संपादन केला. त्याने आपल्या दुकानातून खर्डी येथील दुकानात विक्रीसाठी सोन्याचे दागिने खरेदी केले. दागिने खरेदी केल्यानंतर काही दिवसांंनी पैसे देतो, असे आश्वासन वेळोवेळी खर्डीच्या सराफाने कल्याणच्या सराफाला दिले. सन २०२२ ते जून २०२५ या कालावधीत खर्डीच्या सराफाने (कळवा येथील रहिवासी) कल्याणच्या सराफा दुकानातून ९५० ग्रॅम सोन्याचे दागिने वेळोवेळी खरेदी केले. हे दागिने आपल्या खर्डी येथील दुकानात तो विक्रीसाठी ठेवत होता.
आपणास घाऊक ऐवज उचलणारा घाऊक सराफ मिळाला आहे. आपणास एक रकमी मोठी रक्कम मिळत जाईल या विचाराने कल्याणमधील सराफाने विश्वासाने खर्डीच्या सराफाच्या मागणीप्रमाणे दुकानातील सोन्याचे दागिने बाजारभावाप्रमाणे उधारीने विक्री केले. दागिने घेतल्यानंतर त्याचे पैसे नंंतर देतो, असे कारण खर्डीचा व्यापारी देत होता.
मागील तीन वर्षाच्या काळात खर्डीच्या सराफाकडे कल्याणच्या व्यापाऱ्याचे ९३ लाख ५० हजार रूपये थकित होते. एवढी मोठी रक्कम एक रकमी किंंवा टप्प्याने मिळेल असा विश्वास कल्याणच्या सराफाला होता. ही रक्कम परत करण्याची मागणी कल्याणच्या सराफाने खर्डीच्या सराफाकडे सुरू केली. आर्थिक तंगीची कारणे देऊन खर्डीचा सराफ कल्याणच्या सराफाला पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. एवढी रक्कम होऊनही खर्डीचा सराफ पैसे देण्याचे नाव घेत नसल्याने तो आपली फसवणूक करत आहे याची जाणीव झाल्याने कल्याणच्या सराफाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली आणि खर्डीच्या सराफा विरुध्द ९३ लाख ५० हजार रूपये फसवणुकीचा गुन्हा रविवारी दाखल केला आहे.