डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या डोंबिवली विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली. उन्हामध्ये बसून दिवसभर व्यवसाय करता यावा म्हणून फेरीवाल्यांनी निवारे उभे केले होते. या निवाऱ्यांचा त्रास पादचाऱ्यांना होत होता. याविषयी पालिकेत तक्रारी वाढल्याने हे निवारे बुधवारी दुपारी पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकांनी जमीनदोस्त केले.

फडके रस्ता परिसरातील चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, डॉ. रॉथ रस्ता, नेहरू रस्ता, पाटकर रस्ता, उर्सेकर, मधुबन सिनेमा गल्ली, रामनगर परिसरातील फेरीवाले पथकाने हटविले. गेल्या आठवड्यात राजेश सावंत यांनी फ आणि ग प्रभागाचा साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यापासून त्यांनी फेरीवाल्यांवर आक्रमकपणे कारवाई सुरू केली आहे.

डोंबिवली पूर्वेत दररोज रेल्वे स्थानक भागात ५०० ते ६०० फेरीवाले व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांना फेरीवाला हटाव पथकातील काही कामगारांचे पाठबळ आहे. या फेरीवाल्यांना सामान आणण्यासाठी व्याजाने पैसे देण्याचे काम हे कामगार करतात, अशा तक्रारी आहेत. फ प्रभागातील कारवाई पथकातील अरूण जगताप या कामगाराला एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याचे आणि माजी नगरसेवकाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून अनेक कामगारांच्या विविध प्रभागात बदल्या झाल्या. पण जगताप यांची बदली केली जात नाही. जगताप यांची बदली अन्य प्रभागात केली तर डोंबिवली रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांचे बस्तान आपोआप कमी होईल, असे काही पालिका कर्मचारी खासगीत सांगतात.

पाटकर रस्त्यावरील कामत मेडिकल समोरील पदपथांवरील फेरीवाल्यांवर एकही अधिकारी कारवाई करत नाही. या फेरीवाल्यांना बुधवारी हटविण्यात आले. फ, ग प्रभागाचा भौगोलिक पसारा मोठा असल्याने फेरीवाले, बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ग प्रभागासाठी स्वतंत्र साहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासनाने नेमण्याची मागणी जागरूक रहिवाशांकडून केली जात आहे.

साहाय्यक आयुक्त सावंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी फेरीवाल्यांचे निवारे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यास सुरूवात केली. अचानक कारवाई सुरू झाल्याने फेरीवाल्यांनी रेल्वेची स्वच्छतागृह, तिकीट खिडकी, इमारतींच्या आडोशाला आपले सामान लपविले. नवीन साहाय्यक आयुक्त आला की नऊ दिवस फेरीवाल्यांवर कारवाईचा देखावा केला जातो. असा प्रकार होऊ न देता दररोज अशाप्रकारे फेरीवाल्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रतिक्रीया पादचाऱ्यांकडून देण्यात येत होत्या. फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे होते.

“पदपथ, रस्ते पादचारी, वाहनांसाठी मोकळे असले पाहिजेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांनी निवारे उभारून कायमस्वरुपी व्यवसायासाठी साधन तयार केले होते. त्यांचे निवारे जमीनदोस्त केले. फेरीवाल्यांवरील कारवाई नियमित केली जाईल. कोणीही कामगार फेरीवाल्यांशी संधान ठेऊन असल्याचे सिध्द झाले तर त्या कामगारावर कारवाई केली जाईल”, अशी माहिती डोंबिवलीच्या फ विभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी दिली.