ठाणे : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणामुळे एक रुग्णवाहिका स्थानक परिसरात अडकून होती. या रुग्णवाहिकेचे चित्रीकरण मनसेचे माजी आमदार राजु पाटील यांनी प्रसारित करुन संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे असे म्हणत त्यांनी थेट शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे. नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे, मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे? असाही सवाल त्यांनी उपस्थित करत टीकेची झोड उठविली.

मनसेचे नेते माजी आमदार राजु पाटील यांनी डोंबिवली शहरातील समस्यांविषयी पुन्हा एकदा शिंदे गटाला धारेवर धरल्याचे चित्र आहे. मागील अनेक वर्षांमध्ये शिंदे गट आणि मनसेमध्ये कल्याण डोंबिवली शहरात विस्तवही जात नाही. लोकसभा निवडणूकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर कल्याण डोंबिवली शहरात मनसेला शिंदे गटासोबत जुळवावे लागले होते. मनसेने या शहरात शिंदे गटाला साथ दिली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना मनसेने साथ दिली होती. परंतु विधानसभा निवडणूकीत मनसे आणि शिंदे गटाने वेगवेगळ्या लढविल्या होत्या. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजु पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव झाला. या ठिकाणी शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी त्यांचा धक्कादायक रित्या पराभव केला होता.

यानंतर राजु पाटील यांनी अनेकदा शिंदे यांच्यावर थेट टिका केली होती. नुकतेच त्यांचे एक्स या समाजमाध्यमावरील एक ट्विट चर्चेत आले आहे. त्यांनी एक चित्रीकरण प्रसारित केले आहे. या चित्रीकरणामध्ये डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यंचा विळखा दिसत आहे. या विळख्यात एक रुग्णवाहिका अडकली आहे. या ट्विटमध्ये राजु पाटील यांनी #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर हे हॅशटॅग वापरले आहेत.

काय म्हणाले राजु पाटील?

आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला. हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे. हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे. बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे, मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले.. अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ?