डोंबिवली : मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा धक्कादायक निर्णय रेल्वे प्रशासन एकीकडे घेत असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकल चे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
पावसाचे दिवस सुरू असले तरी उकाडाही कायम आहे. त्यामुळे बहुतांशी प्रवाशांची पसंती वातानुकूलित लोकलला आहे. नेहमीच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी कल्याण दिशेकडून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल आली. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे लोकल डब्यात चढण्यासाठी गर्दी केली. डबा प्रवाशांनी खचाखच भरून गेल्यावरही अनेक प्रवासी वातानुकूलित डब्यात चढण्यासाठी प्रयत्नशील होते.
लोकल डब्याच्या दरवाजाजवळ प्रवाशांची रेटारेटी सुरू होती. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा येत होता. दरवाजे बंद होण्याचे दरवाजा जवळील पिवळे दिव्यांचे इशारे वाजू लागले लागले तरी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. एकही प्रवासी दरवाजातून बाहेर हटण्यास तयार नव्हता. त्यामुळे दरवाजा बंद होण्यात अडथळे येत होते. फलाटावरील रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी दरवाजातील काही प्रवाशांना आत दाबून लोटले. तर दरवाजात लोंबकळत असणाऱ्या काही प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी दरवाजातून खेचून फलाटावर उतरविले.
असे गर्दीचे चित्र बहुतांशी दरवाजांमध्ये होते. दरवाजे बंद होत नाहीत त्या डब्यातील प्रवाशांना डब्यात रेटण्याचे काम रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सुरू केले होते. ही कार्यवाही करेपर्यंत वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी दहा मिनिटे खोळंबली. वातानुकूलित लोकल खोळंबल्याने या लोकलच्या पाठीमागे येणाऱ्या लोकल ठाकुर्ली, कल्याण दिशेने खोळंबून राहिल्या. दहा मिनिटानंतर वातानुकूलित लोकलचे डबे बंद झाल्यानंतर लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
वातानुकूलित लोकलमध्ये बसण्यास जागा नाही मिळाली तरी गारेगार वातावरणात एका जागी उभे राहून सुखासुखी प्रवास करता येतो याचा अनुभव प्रवासी घेतात. त्यामुळे बहुतांशी प्रवाशांची वातानुकूलित लोकलला पसंती आहे. सकाळी प्रवाशांची वातानुकूलित लोकलमध्ये खचाखच गर्दी असते. सकाळच्या वेळेत या लोकलमध्ये रेल्वे तिकीट तपासणीसांची संख्या कमी असते. काही सामान्य लोकलचे तिकीट असलेले प्रवासी वातानुकूलित लोकलमध्ये ठाणे, घाटकोपर, दादरपर्यंत प्रवास करतात.