scorecardresearch

मी आहे तिथेच आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे – सुभाष भोईर

“अन्य बंडखोरीच्या विषयावर आपणास काहीही बोलायचे नाही ”, असंही म्हणाले आहेत.

Subhash Bohir
(संग्रहीत छायाचित्र)

“मी आहे तिथेच आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे ”, असे स्पष्ट करत शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी आपले समर्थन उद्धव ठाकरे यांना जाहीर केले आहे. “अन्य बंडखोरीच्या विषयावर आपणास काहीही बोलायचे नाही. फक्त मी आहे त्याच ठिकाणी आहे ”,’ अशी प्रतिक्रिया माजी आमदार भोईर यांनी दिली.

ठाण्यातील काही नेत्यांना भोईर यांची कामे आणि त्यांचा वाढता दबदबा खूपत होता –

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला टक्कर देण्यासाठी २०१४ मध्ये शिवसेनेने सुभाष भोईर यांना उतरवून पूर्ण ताकदीने निवडून आणले होते. त्यानंतर भोईर यांनी कल्याण ग्रामीण विधासनसभा मतदारसंघातील गावांमध्ये रस्ते, गटारे, पायवाटा, पाणी योजना, गाव विकासाच्या योजना राबवून ग्रामस्थांना आपलेसे केले होते.

त्रालयातून निधी आणून मतदारसंघातील गावांचा सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील होते. भोईर यांचा हा विकास कामांचा झपाटा पाहून पक्षातील काही वरिष्ठांना भोईर खुपू लागले होते. भोईर यांनी कामाचा असाच झपाटा चालू ठेवला तर ते पुढे आटोक्यात येईनासे होतील, मग आपल्या चिरंजिवाचे काय? अशी भीती वाटत होती. पक्षातील ठाण्यातील काही नेत्यांना भोईर यांची कामे आणि त्यांचा ग्रामीण मधील वाढता दबदबा खुपू लागला होता. त्यावेळेपासून भोईर यांचे लक्षात येणार नाही अशा पध्दतीने खच्चीकरण करण्याचे प्रयत्न पक्षातून सुरू झाले होते.

भोईर आणि अन्य नेत्यांमध्ये धुसफूस –

भोईर यांनी मंत्रालयातून, जिल्हा महसूल विभागाकडून प्रयत्नांती निधी मंजूर करून आणून काम सुरू केले की, त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेतील काही मंडळी फलकबाजी करून भोईर यांच्यावर बाजी मारण्याचा प्रयत्न करत होते. ग्रामस्थांनी गावात सुरू झालेले विकास काम हे भोईर यांच्या प्रयत्नांतून सुरू झाले आहे हे माहिती असुनही गावातील फलकावर, शीळफाटा रस्त्यावर लावण्यात आलेल्या फलकांवर त्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी सेनेतील भलतीच मंडळी पुढे आलेली दिसायची. या विषयावरून भोईर आणि काही नेते यांच्यात धुसफूस व्हायची.

त्याची किमत अखेर जिल्हा नेत्यांना मोजावी लागली –

जिल्हा नेत्यांची भोईर यांच्यावर नाराजी असल्याने कोणतेही कारण नसताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईर यांचे नाव उमेदवारीसाठी पक्षाच्या यादीत अग्रक्रमावर असूनही काही जिल्हा नेत्यांच्या पाचरीमुळे भोईर यांचे नाव मागे पडले. डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना कल्याण ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेत चलबिचल झाली. स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्या, बाहेरील उमेदवार येथे नको, अशी ओरड स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा नेत्यांनी डोळे वटारताच स्थानिकांना शांत रहावे लागले होते. अखेर सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी न बोलता जे करायचे ते काम केल्याने म्हात्रे यांना मनसे उमेदवारासमोर पराभूत व्हावे लागले. ग्रामीण मतदारसंघाची बांधणी सुभाष भोईर यांची आणि उमेदवार मात्र शहरी हे सूत्र पदाधिकाऱ्यांना पटलेच नाही. त्याची किमत अखेर जिल्हा नेत्यांना मोजावी लागली.

त्यावेळेपासून भोईर यांना पक्षातून थोडे डावलण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाली. अलीकडे तर भोईर शिवसेनेतच राहतील ना, असा प्रश्न सेना कार्यकर्ते उपस्थित करत होते. ज्या नेत्यांनी भोईर यांच्यावर अन्याय केला त्यांनीच आता बंडखोरी केल्याने त्या संधीचा फायदा घेत जुने उट्टे काढत भोईर यांनी “मी आहे तेथेच आहे. उद्धव साहेब यांच्या सोबतच राहणार आहे.” असे जाहीर करून मी बंडखोरांसोबत नसल्याचा संदेश दिला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I am with chief minister uddhav thackeray subhash bhoir msr