कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे गेल्या वर्षी विशाल गवळी यांनी एका बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या गुन्ह्यात विशाल गवळी पत्नीसह तुरुंगात आहे. त्याचे तीन भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने पोलीस उपायुक्तांनी त्यांना तडीपार केले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास तीन जण दुचाकीवरून मयत बालिकेच्या आई, वडिलांच्या घरासमोर आले. मोठ्याने ओरडा, शिवीगाळ करत दहशत निर्माण केली.

पुना लिंक रस्त्यावरील नंदादीप नगर येथे हा प्रकार घडला. जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो आणि दाखवतो, असे बोलत दगडफेक करत, तेथील सामान फेकून देत, एक पातेले एका रहिवाशाच्या अंगावर फेकून शिवीगाळ केली. पीडित कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न तीन जणांनी केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने रहिवाशांसह पीडित कुटुंबीय घाबरले. पोलिसांनी कल्याण पूर्वेतील गु्न्हेगारी संपविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तरीही काही तरूण कल्याण पूर्व भागात दहशत माजवत असल्याचे समोर आले आहे.

तीन जण पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर दहशत माजवत असल्याचे, शिवीगाळ, दगडफेक करत असल्याचे नंदादीप नगर भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या घटनेची पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी कोळसेवाडी पोलिसांना तातडीने सीसीटीव्ही चित्रणातील तरूणांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कल्याण पूर्व भागात तपास सुरू करून सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पुरुषोत्तम दिलीप शेलार उर्फ वझडी बाबू या मुख्य सूत्रधारासह त्यांचे अन्य दोन साथीदार साहील कालवार, अनिकेत नितनवरे यांना ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तिघांची कोळसेवाडी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मध्यरात्रीच्या वेळेत पीडित कुटुंबीयांच्या घराबाहेर ओरडा करण्याचा या तरूणांचा उद्देश काय होता. त्यांना अशी कृती करण्यास कोणी सांगितले का, अशा अनेक बाजुने पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.