बदलापूर : नेपाळमध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीविरोधात युवकांनी पेटवलेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या गोंधळात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व कल्याण तालुक्यातील अनेक नागरिक पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले असता काठमांडू आणि पोखरा येथे अडकून पडले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील तब्बल १५० पर्यटक संकटात सापडले असून, त्यांच्या संपर्कात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार किसन कथोरे राहिले आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री काही पर्यटकांशी थेट मोबाईलवरून संवाद साधला. “राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, काळजी करू नका,” असा दिलासा त्यांनी पर्यटकांना दिला. विशेषतः मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येने अडकलेल्या नागरिकांशीही शिंदे यांनी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला.

दरम्यान, आमदार किसन कथोरे यांनी देखील काठमांडूत अडकलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. “तुम्ही घाबरू नका, कोणत्याही परिस्थितीत हॉटेल सोडू नका. तुम्हाला सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने चर्चा सुरू आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हेही पर्यटकांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

नेपाळच्या काठमांडू परिसरात मुरबाड तालुक्यातील तब्बल ४७ पर्यटक गेल्या सात दिवसांपासून अडकले आहेत, तर पोखरा परिसरात ६५ पर्यटक अडकलेले आहेत. यापैकी काहींना विशेष विमानाने तर काहींना रस्ते मार्गाने भारतात आणण्याची तयारी सुरू असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी या संदर्भात चर्चा केली असून, लवकरच पर्यटकांना परत आणले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या नेपाळमध्ये आंदोलकांकडून जाळपोळ, गोळीबाराच्या घटना सुरू असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. अशा बिकट परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे व आमदार कथोरे यांचा पर्यटकांशी झालेला संवाद त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरत आहे.