ठाणे – मुंब्रा अपघात प्रकरणात अभियंत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते त्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ऐन सायंकाळच्यावेळी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गाला बसला असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

सीएसएमटी स्थानकावरुन एकही लोकल सोडण्यात आली नसल्यामुळे मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. ठाणे स्थानकवरील फलाट क्रमांक १, २,३ आणि ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे. ऐन घरी जाण्याच्या वेळी रेल्वेचा असा गोंधळ झाल्यामुळे नोकरदार वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेचे ठाणे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. ठाणे स्थानकातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कर्जत अशा विविध भागातील नागरिक नोकरीनिमित्त ठाण्यात येत असतात. त्यामुळे सायंकाळच्यावेळी कल्याण, कर्जत – कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी असते.

ऐन गुरुवारी सायंकाळी ५.४५ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि मोटमरन यांनी आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे लोकल गाड्या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. जवळपास एक तास हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर, आंदोलन मागे घेण्यात आले. परंतू, तो पर्यंत मध्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ऑफिस संपवून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या या नोकरदार वर्गाला या आंदोलनाचा फटका बसला.

रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे मध्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळलेली आहे. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे असलेले ठाणे स्थानकात देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १, २,३ आणि ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे. याप्रकारावरुन प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.