डोंबिवली : करोनाकाळातील निर्बंध कायम असल्याने यंदा कल्याण-डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वागत यात्रेत या वेळी चित्ररथांचा समावेश नसेल, असे गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी पत्रकारांना सांगितले. स्वागत यात्रेच्या निमित्ताने यापूर्वी होणारे सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम मंदिरात होतील. करोना प्रतिबंधक नियम पाळून हे कार्यक्रम केले जाणार आहेत. मंदिर समितीची मंगळवारी रात्री श्री गणेश मंदिरात बैठक झाली. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी पालखी यात्रेत चित्ररथ ठेवले जाणार नाहीत, असे ठरविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत करोना महासाथीमध्ये अनेक कुटुंबांमधील कर्ते पुरुष, कुटुंबातील दोन-तीन सदस्यांचे निधन झाले. अशा कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी त्यांना काही साहाय्य करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच घराबाहेर पडून रहिवाशांनी एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे, हा पालखी यात्रा करण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे अध्यक्ष दामले यांनी सांगितले. धार्मिक कार्यक्रमांवर अधिक भर नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली. करोना साथीमुळे दोन वर्षी यात्रा रद्द करण्यात आली. यात्रेच्या उपक्रमात खंड पडू नये. लोकांना उत्साही वातावरणाचा आनंद घेता यावा, यासाठी मंदिराने गुढीपाडव्यानिमित्त सामाजिक, धार्मिक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे दामले यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळय़ाची तयारी करून, पालखीचा मार्ग निश्चित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.