ठाणे : हिंदी सक्तीचा शासन निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा वरळीत पार पडला. या मेळाव्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी विजयी मेळाव्याच्या व्यासपीठावरील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित छायाचित्र आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी सुचक पोस्ट फेसबुकवर केली आहे. अविनाश जाधव यांची फेसबुक वरील ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
तब्बल १८ वर्षानंतर विजयी मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे नवे वळण घेतले आहे. या विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना असे दोन्ही पक्षांकडून जोमाने तयारी सुरु होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात या विजयी मेळाव्याचे दोन्ही पक्षांकडून बॅनर लावण्यात आले होते.
तर, मेळाव्याच्या पूर्वसंध्येला मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि शिवसेना (ठाकरे गट) राजन विचारे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत विजयी मेळाव्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली होती.
वरळीतील एन. एस. सी. आय. डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडल्यानंतर, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र छायाचित्र आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत “गणपती बाप्पा मोरया” अशी सुचक टिप्पणी केली. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजत असून, अनेक राजकीय जाणकार आणि कार्यकर्ते याचे वेगवेगळे अर्थ लावत आहेत. अविनाश जाधव यांच्या या पोस्टनंतर ठाकरे बंधू मराठी अस्मितेसाठी जसे एकत्र आले तसेच राजकीय दृष्ट्या पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.