ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मागील आठवड्यात लोकल गाडीतून पडून झालेल्या अपघातातील आणखी एका प्रवाशाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल मोरे (४२) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. अनिल यांचा मृत्यू झाल्याने मुंब्रा दुर्घटनेतील मृतांची संख्या पाच इतकी झाली आहे.
अनिल मोरे हे शहापूर तालुक्यातील वाशिंद भागात राहत होते. ते कळवा येथील मनिषा नगर भागातील एका शाळेत नोकरी करत होते. त्यामुळे ते दररोज वाशिंद ते मुंबई असा लोकलने प्रवास करत असत. अपघाताच्या दिवशी त्यांनी कसाऱ्याहून मुंबईला जाणारी लोकल पकडली होती. मात्र सकाळची वेळ आणि प्रचंड गर्दीमुळे त्यांना दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागला होता. मुंब्रा स्थानकाजवळील धोकादायक वळणावर काही प्रवाश्यांसह अनिल देखील खाली पडले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. परंतू, या उपचारा दरम्यान त्यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मृत्यूने स्थानिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.