ठाणे : ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उड्डाणपुलांवर काही दिवसांपुर्वी मास्टिकच्या साहाय्याने खड्डे भरणी करण्यात आली होती. मात्र, यातील वाघबीळ उड्डाणपुलावरील अनेक ठिकाणी बुजविलेले खड्डे उखल्याचे चित्र आहे तर, पातलीपाडा पुलावरील रस्ता मास्टिकमुळे उंच-सखल झाला आहे. यामुळे या पुलांवर अपघातांची भिती व्यक्त होत आहे.
नवे ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. या भागात गेल्या काही वर्षात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. याशिवाय, नवीन गृह संकुल उभारणीची कामे सुरू आहेत. यामुळे या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. या भागातील नागरिक घोडबंदर मार्गे दररोज कामानिमित्ताने वाहतूक करतात. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो प्रकल्प, रस्ते जोडणी कामे यामुळे वाहतूक कोंडी होत असून त्याचा मनस्ताप सहन करत असलेल्या नागरिकांना आता उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
घोडबंदर मार्गावरील पुलांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. यंदाही हे चित्र कायम आहे. वाघबीळ, पातलीपाडा, मानपाडा आणि माजिवाडा उड्डाण पुलांवर काही दिवसांपुर्वी पावसामुळे खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणांनी केले होते.
मास्टीक पद्धतीने ही खड्डे भरणी केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे बुजविलेले खड्डे काही ठिकाणी उखडले आहेत.
वाघबीळ पुलावर हे चित्र दिसून येते. पातलीपाडा पुलावर रस्ता उंच-सखल झाला आहे. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. हि वाहने हेलकावे घेत वाहतूक करीत असून त्यांचा तोल गेल्यास अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.