‘सुरां मी वंदिले’

हीच ‘समाधी’ अनुभवायची असेल तर येत्या शनिवारी रात्री काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात नक्कीच भेट द्या.

शास्त्रीय संगीत म्हणजे श्रोत्यांच्या कानांना पर्वणीच. वाद्यांच्या तालावर झुलत येऊन कानांवाटे हृदयाला येऊन भिडणारे गायकीचे सूर ऐकणाऱ्याला तल्लीन करून टाकतात. हीच ‘समाधी’ अनुभवायची असेल तर येत्या शनिवारी रात्री काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात नक्कीच भेट द्या. ‘बालगंधर्व’ ते ‘कटय़ार काळजात घुसली’पर्यंतचा सुरेल सांगीतिक प्रवास मांडणारा कार्यक्रम ‘सुरां मी वंदिले’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आनंद भाटे, राहुल देशपांडे, भारत बालवल्ली, आरती अंकलीकर-टिकेकर यांसारख्या दिग्गज मंडळी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे काशिनाथ घाणेकर, गडकरी रंगायतन, वेवस् म्युझिकल येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८१९९६५४४४.
कधी- शनिवार, ५ मार्च वेळ- रात्री ८.३० वाजता.
कुठे- डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.).

 

‘द अनटोल्ड स्टोरी २’चे छायाचित्र प्रदर्शन
मुंबईस्थित छायाचित्रकार आणि चित्रकार सायली घोटीकर यांच्या छायाचित्रांचं ‘द अनटोल्ड स्टोरी २’ हे एकल प्रदर्शन मुंबईत मांडण्यात येणार आहे.
छायाचित्र कलेबाबत असं म्हटलं जातं की प्रत्येक वस्तू, ठिकाण हे चित्रित करण्यासारखं असतं, फक्त ते पाहायला कलाकाराचं हृदय लागतं. छायाचित्रकार सायली घोटीकर यांच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. गंजलेली गाडी, जुन्या भिंतीवर ओघळणारे रंग, उभ्या आडव्या रेघोटय़ा मारलेली भिंत, गंजलेले धातूचे तुकडे अशा रोजच दिसणाऱ्या आणि दुर्लक्षित अशा अनेक वस्तू हा छायाचित्रणाचा विषय कसा होऊ शकतो? हे या प्रदर्शनाला भेट दिल्यावर लक्षात येईल. सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमधून पदवी संपादन केल्यावर जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर छायाचित्रकार सायली घोटीकर आता छायाचित्रण आणि चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. सुंदरता आणि कला या सगळीकडेच आहेत असं ही मनस्वी कलाकार मानते आणि त्यावर नेमकेपणाने बोट ठेवते. सदर प्रदर्शनातील छायाचित्रे पाहिल्यावर आपल्याला त्याचा प्रत्यय येतोच. छायाचित्रकार सायली घोटीकर या प्रथम चित्रकार आहेत, या वेळी मात्र कुंचल्याऐवजी आपल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्यांनी ही चित्रं काढली आहेत. कविमनाच्या या कलाकाराचा अमूर्त छायाचित्रणाचा हा अनोखा प्रयोग रसिकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.
कधी : १ ते ११ मार्च, सकाळी १२ ते सायंकाळी ८
कुठे : एनसीपीए पिरामल आर्ट गॅलरी

 

‘मी मिठाची बाहुली..’चे वाचन
गुजराती, मारवाडी नाटय़सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री सुशीलाबाई लोटलीकर अर्थात वंदना मिश्र यांचे ‘मी मिठाची बाहुली..’ हे आत्मकथनपर पुस्तक म्हणजे केवळ त्यांचा जीवनप्रवास नाही तर, त्या काळातील मुंबईच्या जडणघडणीचे, येथील संस्कृतीचे, माणसांमाणसांमधील नात्यांचेही वर्णन आहे. एक प्रकारे मुंबईच्या समाजजीवनाचा आरसा ठरलेल्या या पुस्तकाचे वाचन ऐकण्याचा योग ठाणेकरांना लाभला आहे. ‘मी मिठाची बाहुली.. एक गायिका अभिनेत्रीचे रसिले आत्मचिंतन’ सुप्रसिद्ध अभिनेते उदय नेने आणि मानसी कुलकर्णी या वेळी करणार आहेत. इंद्रधनू आणि मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शब्दयात्रा- सहित्याचा आनंदानुभव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही भाषेतील आपले वाचन वाचकांना ‘शेअर’ करता यावे यासाठी सुरू असलेल्या लोकप्रिय उपक्रमाला लोक आवर्जून उपस्थिती दर्शवतात. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी १० वा. मराठी ग्रंथसंग्रहालय सभागृह, गोखले रोड, नौपाडा, ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. येत्या रविवारी, ६ मार्चला नेहमीच्या वाचन अनुभवाबरोबरच सादर होणार आहे.
कधी- रविवार, ६ मार्च रोजी वेळ- सकाळी १० वाजता.
कुठे- मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.).

 

शास्त्रीय वाद्यांची जुगलबंदी
चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेत शास्त्रीय गायन आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. मुळातच शास्त्रीय संगीताला असलेला अभिजात दर्जा आणि या गायनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांची असलेली गर्दी या शास्त्रीय संगीताला मोठे करते. शास्त्रीय गायनाची मैफल, तबल्याची थाप, हार्मोनिअमचा मधुर सूर अशा मैफलीचा एकत्रित संगम रसिक श्रोत्यांना विलक्षण आनंद देणारा ठरेल. आयोजन संगीत सभा यांच्या बैठक या कार्यक्रमातून रसिकांना हा आनंद लुटता येणार आहे. तबला आणि हार्मोनिअमची जुगलबंदी, तबलावादन, शास्त्रीय गायन या कार्यक्रमात सादर होणार आहे. आरती कुलकर्णी, गणराज वैद्य, मेघनंद बागडे, अलोक इर्दे, अनुराधा गोसावी, मनोज कट्टी, ऋग्वेद देशपांडे अशी कलाकार मंडळी आपली कला सादर करणार आहेत.
कधी- शनिवार ५ मार्च, वेळ- सायंकाळी ७ ते १०.
कुठे- कल्याण गायन समाज सभागृह, टिळक चौक, कल्याण (प.).

 
नृत्य-गायनातून संतांचा जीवनप्रवास
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, गोराकुंभार अशा अनेक संतांनी महाराष्ट्राची भक्तिधारा वाढवली आणि जनसामान्यांचे विचारविश्वही समृद्ध केले. यातील प्रत्येकाचे भक्तिरंग वेगळे, जीवनचरित्र वेगळे आहे. त्यांच्या या जीवनप्रवासाचा आलेख येत्या ६ मार्च रोजी ‘विठा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर होणार आहे. विशेष म्हणजे, अभंगांचे गायन आणि नृत्य यांतून संतांचे कार्यमाहात्म्य सादर केले जाणार आहे. गायनासाठी स्वाती कर्वे व प्रतीक फणसे, नृत्यासाठी अनुजा पितळे व प्राजक्ता कुलकर्णी, तबल्याच्या साथीला गंधार मुजुमदार, हार्मोनियमसाठी केदार खानोलकर आणि निवेदनासाठी मधुरा आपटे असा कलाकारांचा संच ‘विठा’ सादर करणार आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. संपर्क- ९८२०२२५९५४.
कधी- रविवारी, ६ मार्च वेळ- दुपारी ४.३० वाजता.
कुठे- सिद्धेश्वराचे मंदिर, सिद्धेश्वर आळी, लाल चौकी, कल्याण (प.).

 
किशोरदांच्या गाण्यांची मैफील
ज्येष्ठ पाश्र्वगायक किशोरकुमार यांच्या सुमधुर गाण्याची जादू आजही कायम आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या महान गायकाने गायलेल्या गाण्यांवर आधारित मैफली सादर होत असतात. अशीच एक मैफल येत्या सोमवारी ७ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये होणार आहे. काही कलाकारांनी मिळून आयोजित केलेल्या ‘मुड्स ऑफ किशोर’ या मैफलीत गायक नरेंद्र शर्मा, अनी चॅटर्जी, विनय राजेंद्र मोरे, दत्ता राज, जयवंत दुसाने आदी कलावंत किशोर यांच्या सदाबहार रचना सादर करणार आहेत.
कधी- सोमवार, ७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता.
कुठे- डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे (प.).

 
जिने भी दो ना यार..
सर्वसामान्याच्या आयुष्यातील गोड क्षणांचे नाटय़कृतीमध्ये रूपांतर करून नाटय़प्रेमींसाठी कुछ हटके देण्याचा प्रयत्न ‘जिने भी दो ना यार’ या हिंदी नाटकामध्ये केला आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये येत्या रविवारी रात्री नऊ वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हिंदी भाषेतील या नाटय़कृतीमध्ये ओम कतारे, प्रतीक पेंढारकर, राधा भारद्वाज, सोनम सिंह आणि अबिद खान ही कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत.
कधी- रविवार, ६ मार्च, वेळ- रात्री ९ वाजता.
कुठे- काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.).
विविआना मॉलमध्ये पाश्चात्त्य संगीताचे फ्युजन
नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टस्चे विद्यार्थी दर शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून रॉक बॅण्ड सादर करतात. अभिषेक चपके आणि सुनीत बोरकर हे पॉप फ्युजन सादर करणार आहेत. सुरेश काला, अजित कुमार, अविनाश लाम्बा हे
उत्तराखंड संगीत सादर करणार आहेत. राम त्रियो हा विद्यार्थी सुफी संगीत सादर करणार आहे.
कधी- शनिवार, ५ मार्च, वेळ -सायंकाळी ६ वाजता.
कुठे- विविआना मॉल, ठाणे (प.).

 

समाज बांधिलकीची ‘छाया’- विद्युल्लता-२०१६
दैनंदिन गरजा भागविताना आयुष्याशी दोन हात सारेच करतात. मात्र रोजीरोटीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या महिलांचा संघर्ष ठाणे येथील फोटो सर्कल सोसायटीच्या महिला छायाचित्रकारांनी कॅमेऱ्याच्या चौकटीतून मांडलेला त्यांचा प्रवास ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. ठाणे कलाभवनामध्ये ४ ते ६ मार्च या कालावधीत ‘विद्युल्लता-२०१६’ छायाचित्र प्रदर्शनाच्या
माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्या समाजकार्याने गरिबांचे व दुर्बलांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या १५ महिलांचा परिचय करून देण्यात येणार आहे.
संस्थेच्या महिला फोटोग्राफरांनी महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला काही देऊ पाहणाऱ्या स्त्रियांना आपल्या प्रकाश चित्रणामार्फत लोकांपुढे आणले. नेहा मांडलेकर, वेदिका भार्गव, स्वप्नाली मठकर, रेखा भिवंडीकर, स्नेहा गोरे, यांसारख्या १२ महिला छायात्रिकांरानी विद्युल्लतांच्या संपूर्ण कार्याचा अभ्यास करून त्यांच्या कार्याचे चित्रण केले. छायाचित्रे प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वासमोर त्याच्या कार्याचा प्रकाश पडणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती पुरस्कारविजेता ठमाताई पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच अ‍ॅड. माधवी नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
कधी- शुक्रवार, ४ मार्च वेळ- सायंकाळी ६ वाजता.
कुठे- ठाणे कलाभवन, बिग बाझार जवळ, कापुरबावडी, ठाणे (प.).

 

राजस्थानी जीवन दाखविणारे प्रदर्शन
सांगलीस्थित चित्रकार अनुष्का वरेकर यांचे ‘साँग्ज ऑफ कलर’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि. २९ फेब्रुवारी ६ मार्च २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामूल्य खुले राहील.
चित्रकार अनुष्का वरेकर यांनी लातूर येथील चित्रकला महाविद्यालय आणि सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयामधून चित्रकलाविषयक शिक्षण पूर्ण केले आहे. या चित्रमालिकेत राजस्थानी लोकपरंपरा आणि लोकजीवनातील अनेक दृश्ये आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने साकार केली असून तीसहून जास्त चित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. अ‍ॅक्रिलिक रंग आणि तैलरंगात रंगवलेली कॅनव्हासवरची ही चित्रे विविध आकारांतील असून अनेक रंगछटांचा संयमित वापर केला गेला आहे. या अनोख्या चित्रांमध्ये वाळवंटातील सोनेरी सकाळ, उंटावरून सफरीवर निघालेले प्रवासी, बोलक्या बाहुल्या, सण आणि उत्सव साजऱ्या करणाऱ्या राजस्थानी स्त्रिया अशी अनेक दृश्ये रसिकांना पाहावयास मिळतील.उच्च कलाभिरुचीचा आनंद देणाऱ्या या चित्रांत मांडणीमधील वैविध्य, मानवाकृती आणि प्राण्यांचा हुबेहूब देखावा, आगळीवेगळी वेशभूषा आणि प्रसंगाचे यथोचित दर्शन यामुळे हे प्रदर्शन म्हणजे राजस्थानच्या रंगोत्सवाचे प्रत्ययकारी दर्शन ठरते. मुंबईकर कलारसिकांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.
कधी: ५ ते ६ मार्च २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७
कुठे: जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी, काळा घोडा

 

चिमुकल्यांच्या भेटीला ‘निन्जा हातोडी’
लहान मुलांना नेहमीच विविध कार्टूनचे आकर्षण असते. हे कार्टून्स म्हणजे त्यांच्या जीनवशैलीचा एक भागच बनलेली असतात. मग या कार्टून्सचे आवाज जरी ऐकू आले तरी ही मंडळी अगदी सहजरीत्या कुठल्या कार्टून्सचा आवाज आहे ते सहज ओळखतात. दूरचित्रवाणीवर दिसणार निन्जा हातोडी प्रत्यक्षात पाहायला मिळाला तर बच्चे कंपनीसाठी ती एक पर्वणीच ठरेल. असेच निन्जागो कार्टून तयार करण्याचे आयोजन ६-७ मार्चला खास फनस्कूल इंडिया कंपनीतर्फे करण्यात आले आहे. ३० हजार लेगो विटांपासून ७ फूट लांबीचा हा निन्जागो तयार करण्यात येणार आहे. हा निन्जागो बनविण्यासाठी लहान मुलांनाही सहभागी होता येणार आहे. हा इव्हेंट सर्वासाठी मोफत खुला आहे.
कुठे- मेट्रो मॉल जंक्शन, शीळ रोड, कल्याण (पू.).
कधी- ६-७ मार्च, सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

 

महिलांसाठी ‘शॉपिंग’ची पर्वणी
खरेदी करणे स्त्रियांचा जन्मसिद्ध हक्कच जणू. त्यामध्येही जर एकाच छताखाली अनेक गोष्टी उपलब्ध असतील तर सोन्याहून पिवळे. कझ्युमर सेंटरतर्फे भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्राहक पेठ सध्या सुरू असून येत्या सोमवार, ७ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत घंटाळी मैदान, घंटाळी रोड, ठाणे (प.) येथे सर्वासाठी खुली राहणार आहे. मसाले, मुखवास, कपडे, पैठणीच्या पर्स, साडय़ा, ड्रेस मटेरियल, कागदी फुले, चांदीच्या भेटवस्तू, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ, किचनवेअर, मातीची भांडी, मालवणी वस्तू व पदार्थ, बनारसी वस्तू अशा विविध गोष्टींचा समावेश यामध्ये आहे.
कधी- २ ते ७ मार्चपर्यंत, वेळ- सकाळी १० ते रात्री ९.
कुठे- घंटाळी मैदान, घंटाळी रोड, ठाणे (प.).

 

वाजंत्र्यांचे चित्र प्रदर्शन
मुंबईस्थित सुप्रसिद्ध चित्रकार शांतकुमार हत्तरकी यांचं ‘इनर व्हॉइस’ हे चित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. चित्रकार शांतकुमार यांच्या चित्रांमध्ये नैसर्गिक रंगपोत आणि आकारांना महत्त्व देण्यात आले आहे. ‘म्युझिशियन्स’ या मालिकेत आकार, अवकाश, रंग आणि आकृती याद्वारे वाजंत्र्यांमधला सामना आणि तोल यांचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे. गडद रंगाच्या मोठय़ा पृष्ठभागावर केलेला कलात्मक वापर आणि देहबोली हे या चित्रांचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. अनोख्या चित्रशैलीतील वाद्य वाजवणाऱ्या व्यक्तींचे ‘म्युझिशियन्स’ हे चित्रकला प्रदर्शन चित्ररसिक आणि संग्राहक यांच्यासाठी एक अपूर्व संधी ठरणार आहे.
कधी: १ ते ७ मार्च २०१६
कुठे: जहांगीर आर्ट गॅलरी, १६१-बी, काळा घोडा

 

संकलन : शलाका सरफरे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Weekly events in thane

ताज्या बातम्या