AIIMS-Rishikesh Video:  हृषिकेश एम्स रुग्णालयातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये पोलीस व्हॅन घेऊन थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये गेल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी रुग्णालयातील सुरक्षा रक्षक शिटी वाजवून वॉर्डातील रुग्णांचे स्ट्रेचर बाजूला करताना दिसत आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टराने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस थेट व्हॅन घेऊन वॉर्डात दाखल झाले होते. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१९ मे) संध्याकाळी हृषिकेश एम्सच्या ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरू होती. त्या वेळी शस्त्रक्रिया विभागात तैनात असलेल्या महिला डॉक्टरचा नर्सिंग अधिकारी सतीश कुमार याने विनयभंग केला होता.

या प्रकरणाचा निषेध करीत रुग्णालयातील डॉक्टरांनी संपावर जाऊन, आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू केली. एम्सच्या डॉक्टरांनी अधिष्ठात्यांच्या कार्यालयालाही घेराव घातला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी नर्सिंग अधिकारी सतीश कुमारविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली.

आरोपीला पकडण्यासाठी पोलीस थेट व्हॅन घेऊन रुग्णालयात पोहोचले. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्थेत आरोपीला अटक करण्यात आली. परिस्थिती पाहून पोलिसांनी व्हॅन थेट रुग्णांनी भरलेल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी शिट्या वाजवून रुग्णांचे स्ट्रेचर पटापट बाजूला केले. वॉर्डात पोलिसांची भरधाव आलेली व्हॅन पाहून रुग्णही अवाक् झाले.

“बाईक म्हणजे नवरी आहे का सजवायला?” पोलिसाने चालकाला फटकारले, VIDEO पाहून म्हणाल, “दंड वसुलीची निन्जा टेक्निक….”

आरोपी नर्सिंग अधिकारी सतीश कुमार हा मूळचा राजस्थानचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. उत्तराखंड महिला आयोगाच्या अध्यक्ष कुसुम कंडवाल यांनीही या घटनेबाबत एम्स प्रशासनाची भेट घेऊन, या प्रकरणाची चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २१ मे रोजी पीडित डॉक्टरने कोतवाली हृषिकेश येथे लेखी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार १९ मे रोजी ट्रॉमा ओटी कॉम्प्लेक्स एम्समधील नर्सिंग अधिकारी सतीश कुमारने पीडित डॉक्टर महिलेचा शारीरिक छळ केला आणि धमकी दिली. तक्रारीच्या आधारे तत्काळ गुन्हा दाखल करून, आरोपीवर कारवाई करण्यात येत आहे.