दिवाळीनिमित्त यंदा सर्वत्र गजबज पाहायला मिळाली. आकाशकंदील, पणत्या, दारात रांगोळी, तोरण, विद्युत रोषणाई यांच्याद्वारे केलेली सजावट चाळ, ऑफिस, इमारती आदी ठिकाणी करण्यात आलेली दिसून येत आहे. बाजारात विविध प्रकारच्या अनेक रंगांच्या पणत्या तुम्ही पाहिल्या असतील. पण, या लख्ख प्रकाश देणाऱ्या पणत्या कशा तयार केल्या जातात हे तुम्ही कधी पाहिले आहे का ? नसेल, तर आज एका युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात या मातीच्या पणत्या कशा तयार केल्या जातात हे दाखविण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कामगार माती चाळून घेताना दिसत आहेत. त्यानंतर या मातीमध्ये थोडे पाणी घालून, ती पिठाप्रमाणे मळून घेतली जात आहे. त्यानंतर फिरत्या चाकावर ही ओली माती ठेवून, त्या मातीला कामगार पणतीचा आकार देत आहेत आणि अशा छोट्या छोट्या पणत्या बनवून, त्या बाजूला ठेवण्यात येत आहेत. नंतर पणत्या सुकल्यावर एक सेटअप तयार करून घेण्यात आला आहे आणि त्यात या पणत्या ठेवून, त्या भाजून घेण्यात आल्या आहेत. कशा प्रकारे मातीच्या पणत्या बनवल्या जात आहेत ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…पारंपरिक ते अधिक सुंदर! कोकणातील अनोखा आकाश कंदील; इको फ्रेंडली कंदीलाचे PHOTO पाहून म्हणाल वाहह..
व्हिडीओ नक्की बघा :
पणत्या तयार करण्यासाठी भट्टी (सेटअप) तयार करून घेण्यात आली आहे. त्यात सुकलेले शेण आणि त्यावर छोट्या छोट्या पणत्या लावून ठेवल्या आहेत. नंतर पुन्हा त्याच्यावर सुकलेले शेण, सुकलेले गवत टाकून, या पणत्यांना भट्टीत भाजून घेतले जात आहे. त्यानंतर काही वेळाने तुम्हाला मातीच्या पणत्या तयार झालेल्या दिसतील. पणत्या तयार झाल्यावर त्यांना बाजारात विक्रीसाठी पाठविण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Thefoodiehat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एक मेहनती कुंभार कुटुंब’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच अनेक जण या कुटुंबाच्या मेहनतीचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच पाच-दहा रुपयांत मिळणाऱ्या या पणत्या बनवण्यासाठी एवढी मेहनत करावी लागते हे बघून अनेक जण भावूक कमेंट्स करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.