Ashadhi Wari 2025 Viral Video : पाऊले चालती पंढरीची वाट… हे शब्द जरी कानावर पडले की, तहान-भूक, जात-धर्म विसरून, अनवाणी चालत, फुगड्या, भजन गात सगळ्यांबरोबर चालत जाणारे वारकरी दिसू लागतात. त्यामुळे एकदा तरी वारीत जाण्याचं सुख अनुभवता यावं हीच आपल्यातील प्रत्येकाची इच्छा असते. अनेक जण या वारीत वारकऱ्यांची सेवा करायला जातात. त्यामध्ये त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय, त्यांच्या पायांना मालिश, अगदी डॉक्टर, नर्ससुद्धा त्यांना काय हवं नको ते बघायला वारीत उपस्थित असतात. पण, आज एका आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

व्हायरल व्हिडीओ वारीचा आहे. वारीत अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण पायी चालताना दिसत आहेत. पण, या सगळ्यात भरउन्हात डोक्यावर पदर घेऊन आजी वारी बघायला आल्या आहेत. एवढंच नाही, तर त्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहून वारकऱ्यांसाठी खास गोष्ट करताना दिसत आहेत; जी सोन्यापेक्षा लाखमोलाची आहे. आजी पिशवीत शेंगा भरून घेऊन आल्या आहेत. तसेच मूठ भरून शेंगा आजी वारीत चालणाऱ्या प्रत्येकाच्या हातात देताना दिसत आहेत.

इथे प्रत्येक माणसात देव असतो (Viral Video)

वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांसाठी प्रत्येक जण काही ना काही करण्याच्या प्रयत्नात असतो. आपण केलेली सेवा वारकऱ्यांकडून विठुरायापर्यंत पोहोचावी हाच यामागचा उद्देश असते. त्यामुळे आजी श्रीमंत नाहीत, तिच्याकडे पैसे नाहीत; पण तिच्याकडे मनाची श्रीमंती आहे. त्यामुळे आजी पिशवी भरून वारकऱ्यांसाठी शेंगा घेऊन आली आहे. तसेच प्रत्येक वारकरीसुद्धा रखुमाई आजींच्या रूपात आली, असं समजून तिच्याकडून थांबून, थांबून शेंगा घेताना दिसत आहेत. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा….

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nikkis_art_by_heart या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माणूस पैशांनी नाही, तर मनाने श्रीमंत व्हावा’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “फक्त देण्याची इच्छा पाहिजे. मग देव काही कमी पडू देत नाही, राम कृष्ण हरी”, “डोळ्यांत पाणी आलं बघूनच”, “रखुमाई आली आजींच्या रूपात…”, “त्या शेंगा लाखमोलाच्या आहेत”, ” खरंच वारीमध्ये कधी देव भेटेल सांगता येत नाही”, “आजीने रडवले”, “वारीत देणारा आणि घेणारा… दोघेही श्रीमंतच… देणारा कितीही गरीब असला तरी दान देईल आणि घेणारा कितीही श्रीमंत असला तरी श्रीमंतीचा गर्व न करता ते घेईल… इथे प्रत्येक माणसात देव असतो”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.