मतदान हा प्रत्येक लोकशाही प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. प्रगत तंत्रज्ञान प्रणालींचा वापर करण्यात येत आहे. सुरुवातीला नागरिक त्यांचे मत हे बॅलेट पेपर्समध्ये म्हणजेच मतपत्रिकांमध्ये नोंदवत असत. मात्र, आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम [EVM] चा वापर अनेक देशांमध्ये केला जातो. दोन्ही पद्धतीने आपापले फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे निवडणुकांदरम्यान या दोन्ही पद्धतींमधील फरक जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.

पारंपरिक पद्धत – मतपत्रिका / बॅलेट पेपर

अनेक वर्षांपासून जगभरातील प्रत्येक मतदान केंद्रांवर मतपत्रिकांद्वारे मतदान केले जात होते. जेव्हा मतदानासाठी मतदान केंद्रावर नागरिक येत असत तेव्हा त्यांना निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या किंवा पक्षांच्या पर्यायांची यादी असलेली मतपत्रिका दिली जात असे. नागरिक त्यांना हव्या असणाऱ्या उमेदवारांसमोर वा पक्षांच्या पर्यायासमोर खूण करतात. नंतर खूण केलेली मतपत्रिका दुमडून एका सुरक्षित मतपेटीत टाकली जात असे.

हेही वाचा : Voter ID and Aadhaar Linking : वोटर आयडीसह कसे करायचे आधार कार्ड लिंक? जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया

मतपत्रिकेचे फायदे –

मतपत्रिकेत नागरिक स्वतःच्या हाताने, प्रत्यक्षात मत लिहून देत असल्याने त्यांना त्यांचे मत अचूकपणे नोंदवल्याची खात्री असते.
मतपत्रिका या प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी सोयीची असते. मतपत्रिकांच्या मदतीने मत देण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकाच्या तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक नसते.
मतपत्रिकांमध्ये नोंद केलेल्या मतांमुळे, फेरमोजणी करण्यास फायदा होतो.

मतपत्रिकेचे तोटे –

कागदी मतपत्रिका मोजणे हे प्रचंड कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. तसेच या कामासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी आवश्यक असतात, त्यामुळे निवडुकीचे निकाल जाहीर करण्यासदेखील विलंब होऊ शकतो.

मत मोजताना मोजणीमध्ये चुका होऊ शकतात, ज्यामुळे वाद-विवाद होण्याच्या शक्यता असतात.

मतपत्रिकांचे कागद तयार करणे, प्रिंट करणे, लाखो नागरिकांना वाटणे आणि गोळा करणे या सर्व गोष्टी प्रचंड खर्चिक आणि आव्हानात्मक ठरू शकतात; खास करून मोठ्या निवडणुकांसाठी.

हेही वाचा : ‘या’ WhatsApp ग्रुपमधील गोंधळ होईल कमी! नव्या फीचर्सची मार्क झुकरबर्गने केलेली घोषणा पाहा…

प्रगत तंत्रज्ञान – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVMS)

निवडणुकांमध्ये मतमोजणीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम ही तंत्रज्ञानाची प्रगती दर्शवितात. हे यंत्र प्रत्येक मत सुरक्षितरित्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मोजण्यासाठी बनवण्यात आले आहे. निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या व्यक्तीला वा पक्षाच्या चिन्हासमोरील बटण दाबून नागरिक त्यांना हव्या असणाऱ्या पर्यायाची निवड करतात. एकदा मत दिल्यानंतर ते यंत्राच्या मदतीने जमा केले जाते.

ईव्हीएमचे फायदे –

ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदानामुळे वेळेची बचत होते. तसेच सर्व मतांची मोजणी ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असल्याने निकाल लवकरात लवकर लावण्यास मदत होते.

मनुष्याकडून होणाऱ्या चुका या मशीनकडून होत नसल्याने, मतमोजणी अचूक पद्धतीने करण्यास फायदा होतो. नागरिकांनी मत दिल्यानंतर, त्यांचे मत अचूकपणे नोंदवल्याचा त्वरित अभिप्राय दिला जातो.

ईव्हीएममध्ये गुंतवणूक करणे सुरुवातीला खर्चिक असू शकते. मात्र, यामुळे छपाई साहित्य तसेच कर्मचाऱ्यांची गरज कमी करून दीर्घकाळासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.

ईव्हीएमचे तोटे –

ईव्हीएम यंत्रासह छेडछाड करणे, हॅक करणे सहज शक्य असल्याचे टीकाकारांचे म्हणणे असते, ज्याचा परिणाम निवणुकांच्या निकालांवर होऊ शकतो.

ज्या नागरिकांना तंत्रज्ञानाची कोणतीही माहिती नसते, अशा नागरिकांसाठी ही ईव्हीएम यंत्रणा गोंधळात टाकणारी असू शकतात; त्यामुळे काही प्रमाणात लोक या मतदानापासून वंचित राहू शकतात.

मतपत्रिका आणि ईव्हीएमसारख्या यंत्रांचे आपले फायदे आणि तोटे आहेत.

मतपत्रिकांद्वारे मत दिल्याने नागरिकांमध्ये पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा राहण्यास मदत होते. असे असले तरीही, अशा कागदी मतांची मोजणी करताना मतमोजणी करणाऱ्या मनुष्यांकडून चूक होण्याची शक्यता असते, तर ईव्हीएमद्वारे मतदानाची प्रक्रिया वेगाने होत असली तरीही त्याच्या सुरक्षेबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ शकतात.