वसई : विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ला येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. शिवाजी शिंदे (४८), रंगीता शिंदे (४२) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव असून ते विरार पूर्वेच्या जी एम कॉलनी परिसरात राहत होते.
विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला परिसर आहे. या किल्ल्यावर विविध ठिकाणच्या भागातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. शनिवारी सायंकाळी किल्ल्यात शिवाजी शिंदे व त्याची पत्नी रंगीता शिंदे हे दोघे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळ झाली तरीही ते याच भागात फिरत असल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले होते.
मात्र रविवारी सकाळी ९.३० सुमारास किनाऱ्यावर दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती येथील ग्रामस्थांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले.
चौकशी केली असता हे दोघे ही विरार पूर्वेच्या जी एम कॉलनी येथील गुलाब स्वामी दर्शन इमारती मध्ये राहणारे असल्याचे तपासात उघड झाले. वज्रेश्वरी येथे दर्शनाला जातो सांगून हे घरातून बाहेर निघाले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघे पाण्यात बुडाले की आत्महत्या केली याचा तपास पोलीस करीत आहेत.